पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 02:29 PM2024-06-11T14:29:06+5:302024-06-11T14:31:17+5:30
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही नेत्यांकडून जाहीरपणे होत असलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली.
NCP Jayant Patil ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून दोन पक्ष निर्माण झाले. मात्र लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ८ जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीलाही पवारांची राष्ट्रवादी ताकदीने सामोरी जाणार आहे. मात्र आता या पक्षातही अंतर्गत वाद सुरू असल्याचं दिसत आहे. कारण काल पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही नेत्यांकडून जाहीरपणे होत असलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आयोजित सभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "माझ्या प्रदेशाध्यक्षपदाचे महिने याआधी अनेकांनी मोजून झाले आहेत. आता पुढचे चार महिने मोजू नका. कारण आता निवडणूक आहे. जाहीरपणे बोलायचे बंद करा. काही तक्रार असेल तर शरद पवार यांना भेटून ती तक्रार करा. त्यावर ते आमच्या दोन कानाखाली मारतील, नाहीतर त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेतील. फक्त ट्विटरवर वगैरे बोलणं बंद करा," असं आवाहन पाटील यांनी केलं आहे.
"मी सगळो नीट करतो. पक्ष ही कोणा एकाची संपत्ती नाही, महाराष्ट्रातील लाखो लोकांचा हा पक्ष आहे. मी चुकीचो वागलो तर सगळ्या महाराष्ट्रातील जनतेवर याचा परिणाम होणार, याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागू. पुढील चार महिने आपण एका दिलाने राहू. नोव्हेंबरनंतर मीच प्रदेशाध्यक्ष म्हणून नमस्कार करेन. पण तोपर्यंत जाहीरपणे आणि खासगीतही चर्चा करू नका. काही सूचना असतील तर मला येऊन सांगा. लोकसभेत झालेला विजय हा माझ्या एकट्याचा नाही. हे टीम वर्क आहे. त्यामुळे चिंता करू नका, विधानसभेतही आपल्या बाजूनेच निकाल येईल," असंही जयंत पाटील म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी काय म्हटलं होतं?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील काही नेत्यांच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त करत आहेत. "राज्यात मविआला मिळालेला विराट विजय हा आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी न डगमगता उघडपणे केलेल्या संघर्षाचा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि स्वाभिमानी जनतेचा आहे. धाडस दाखवून प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला सत्याची जोड असेल तर यशाला कुणीही रोखू शकत नाही. पण अशा परिस्थितीत आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून काही सेटिंग तर करत नव्हते ना? याचाही शोध घेण्याची गरज आहे. अन्यथा ऐन विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ नये, म्हणजे झालं," असं रोहित पवार यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं होतं. तसंच काल झालेल्या सभेतही रोहित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. "काही नेत्यांनी दोन दगडांवर पाय ठेवले आहेत. त्यांनी एक तर इकडे थांबावं किंवा तिकडे जावं," असं रोहित पवारांनी म्हटलं होतं. मात्र रोहित पवार हे नक्की कोणाला उद्देशून असं म्हणाले होते, हे अद्याप अस्पष्ट आहे.
शशिकांत शिंदे, रोहित पवार यांच्याकडे राज्याची जबाबदारी देण्याची मागणी
जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असताना पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी नुकतीच शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांच्याकडे राज्याची मुख्य जबाबदारी देण्याची मागणी केली. "निष्ठावान ,लढाऊ नेते शशिकांत शिंदे आणि युवा आमदार रोहित पवार यांच्याकडे आता प्रदेश पक्ष संघटनेची मुख्य जबाबदारी द्यायला हवी. तसेच सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पक्ष संघटना वाढवली पाहिजे," अशी मागणी सोशल मीडिया पोस्टद्वारे लवांडे यांनी केली होती.