चुरशीच्या लढतीत श्रीगोंद्यात फुलले कमळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 05:06 PM2019-10-25T17:06:35+5:302019-10-25T17:07:09+5:30

भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांचा ४ हजार ७४० मतांनी पराभव करीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलविले. पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अखेर पाचपुतेंनी बाजी मारली. प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या चिन्हावर आमदार होण्याचा बहुमान पाचपुते यांनी सातव्यांदा मिळविला.

Lotus blossoms in Shrigondi during the battle of Churshi | चुरशीच्या लढतीत श्रीगोंद्यात फुलले कमळ

चुरशीच्या लढतीत श्रीगोंद्यात फुलले कमळ

श्रीगोंदा विधानसभा निवडणूक विश्लेषण - बाळासाहेब काकडे । 
श्रीगोंदा : भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांचा ४ हजार ७४० मतांनी पराभव करीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलविले. पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अखेर पाचपुतेंनी बाजी मारली.
प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या चिन्हावर आमदार होण्याचा बहुमान पाचपुते यांनी सातव्यांदा मिळविला.  निवडणुकीत एकतर्फी यश मिळेल या आशेने पाचपुते यांचे समर्थक सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. अपेक्षेप्रमाणे तेराव्या फेरी अखेर पाचपुते यांनी आघाडी राखली होती. मात्र त्यांना मोठी आघाडी नव्हती. अवघी तीन ते चार हजाराच्या आसपास आघाडी होती. १७ व्या फेरी अखेर घनश्याम शेलार यांनी ३३५७ मतांची आघाडी घेतल्याने चुरस निर्माण झाली. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली. त्यानंतर घोड कालव्याचा पट्टा पुन्हा एकदा पाचपुतेंच्या मागे उभा राहिला. श्रीगोंदा शहर, लिंपणगाव, काष्टी व आढळगाव या गावांनी 
निर्णायक आघाडी देत पाचपुतेंना तारले
निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच नाट्यमय घडामोडी घडल्या. आमदार राहुल जगताप व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी उमेदवारी नाकारली. नागवडे यांनी तर भाजपत प्रवेश करून पाचपुतेंमागे ताकद दिली. यामध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांनी मोलाची भूमिका पार पाडली. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्टÑवादीच्या उमेदवारीची माळ घनश्याम शेलार यांच्या गळ्यात घातली. शेलार यांच्या मागे आमदार जगताप यांनी ताकद उभी केली. शेलारांसाठी शरद पवार व खासदार अमोल कोल्हे यांच्याही सभा झाल्या होत्या. पवारांच्या सभेतनंतर श्रीगोंद्यात रंगत निर्माण झाली. ही निवडणूक कुकडी, घोडचे पाणी अगर इतर प्रश्नांभोवती फिरण्याऐवजी शरद पवारांविषयी सहानुभूती, नातेगोते अशा मुद्यांकडे वळली होती. 
पाचपुते यांनी त्यांचे कुटुंबीय, कार्यकर्त्यांच्या सहाय्यानेच प्रचार केला. पाचपुते यांना एक लाख दोन हजार ५०३, तर घनश्याम शेलार यांना ९७ हजार ९८० मते मिळाली. संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस यांनी ऊस उत्पादक शेतक-यांच्या बिलासाठी आंदोलन उभारले. मात्र त्यांना जनतेनेस्वीकारले नाही. वंचित बहुजन आघाडीचे मच्छिंद्र 
सुपेकर यांनी ३ हजार १८६ मते मिळाली.
आघाडी राष्ट्रवादीची.. जल्लोष भाजपचा  
चौदाव्या फेरीपासून राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांनी आघाडी घेतली होती. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष चालूच ठेवला होता. नंतर ते शांत झाले होते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना चांगलीच हुरहुर लागली होती. 
व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची फेरमोजणी..
व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या व ईव्हीएममधील प्रत्यक्ष मतदान यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्या मतात एकाची तफावत आढळली. याबाबत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतिनिधी मोहन भिंताडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्याकडे तक्रार केली व फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामुळे चिठ्ठ्यांची पुन्हा मोजणी 
करण्यात आली. यात बराच वेळ गेला. अखेर मोजणीअंती ही तफावत दूर झाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी अंतिम निकाल जाहीर केला. 
सर्वांच्या साथीने विजय
सन २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्याने पुन्हा एंट्री करणे अवघड होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ आणि सतत जनसंपर्क ठेवला. जीवाभावाचे कार्यकर्ते आणि गोरगरीब मतदारांनी दिलेली साथ, यामुळे विजय झाला. त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले.  
    

Web Title: Lotus blossoms in Shrigondi during the battle of Churshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.