दूध संघांकडून सरकारच्या आदेशाला केराची टोपली; जुलैमध्ये जुन्याच दराने दूध खरेदी 

By शिवाजी पवार | Published: July 19, 2024 03:28 PM2024-07-19T15:28:38+5:302024-07-19T15:30:15+5:30

३० रूपये दर देण्यास संघांची टाळाटाळ 

Milk rate hike ordered by government in dust bin; Purchase of milk at old price in July  | दूध संघांकडून सरकारच्या आदेशाला केराची टोपली; जुलैमध्ये जुन्याच दराने दूध खरेदी 

दूध संघांकडून सरकारच्या आदेशाला केराची टोपली; जुलैमध्ये जुन्याच दराने दूध खरेदी 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्य सरकारने एक जुलैपासून दुधाला ३० रुपये लिटर दर तसेच पाच रुपये अनुदानाचे आदेश काढले. मात्र गुजरात स्थित दूध संघांनी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून २७ रुपये लिटर दराने खरेदी सुरू ठेवल्याची माहिती समोर आली आहे. काही दूध संघांनी १ ते १५ जुलै दरम्यान दुधाची बिले अद्याप अदा केलेली नाहीत, तर काहींनी दुधाचे पैसे वर्ग केले असले तरी बिले मात्र दिले नाहीत. त्यामुळे सरकारच्या आदेशाला संघाकडून केराची टोपली दाखविली गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दुधाचे दर कोसळल्यामुळे विशेष परिस्थितीत बाजारात हस्तक्षेप करत सरकारने अनुदान योजना सुरू केली. ५ जानेवारी २०२४ पासून प्रारंभी दोन महिन्यांसाठी शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला. २८ जूनपासून पुन्हा अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. सहकारी व खासगी दूध संघ या दोघांनीही योजना लागू करावयाची आहे. शेतकऱ्यांना ३.५ फॅट व ८.५ एसएमएस या गुणप्रतीसाठी किमान ३० रुपये दर बँक खात्यावर अदा करणे बंधनकारक आहे. त्यानंतर सरकारचे पाच रुपये अनुदान मिळते.

दरम्यान, श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुजरात स्थित दूध संघाकडून २७ रुपये ८३ पैसे लिटर दराने पैसे बँक खात्यात वर्ग झाल्याची माहिती लोकमतला दिली. अन्य काही संघांकडून अद्याप जुलैच्या पंधरवड्याचे पैसे जमा झालेले नाहीत. ज्या संघांकडून पैसे मिळाले त्यांनी बिले दिलेली नाही. त्यामुळे सर्वच संशयास्पद सुरू आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दूध अनुदान योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना ३० रुपये दर तसेच पाच रुपये अनुदान एक जुलैपासून मिळेल.
 गिरीश सोनवणे,
जिल्हा दुग्धविकास अधिकारी, नगर.

सहकारी व खासगी दूध संघ जर सरकारच्या आदेशाप्रमाणे ३० रुपये लिटर दर देणार नसतील तर त्यांचे परवाने रद्द करावे. सरकारने दोषी दूध संघावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
 ऍड. अजित काळे,
 राज्य उपाध्यक्ष, शेतकरी संघटना

Web Title: Milk rate hike ordered by government in dust bin; Purchase of milk at old price in July 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.