निर्भयाला हवे असायचे दररोज खाऊला पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2016 11:50 PM2016-07-19T23:50:30+5:302016-07-20T00:26:02+5:30

टीम लोकमत , अहमदनगर निर्भयाची सायकल पाहतेय तिची वाट ! निर्भयाची सायकल अन् तिचे अंगण तिची जणू वाट पाहते आहे. कुठल्याही ग्रामीण मुलीला जगाशी जोडण्यासाठी सायकल खूप मदत करते.

Money should be eaten every day if it wants to be fearless | निर्भयाला हवे असायचे दररोज खाऊला पैसे

निर्भयाला हवे असायचे दररोज खाऊला पैसे

Next


टीम लोकमत , अहमदनगर
निर्भयाची सायकल पाहतेय तिची वाट !
निर्भयाची सायकल अन् तिचे अंगण तिची जणू वाट पाहते आहे. कुठल्याही ग्रामीण मुलीला जगाशी जोडण्यासाठी सायकल खूप मदत करते. निर्भयाही सायकलवरच शाळेत ये-जा करत उत्तम खो-खो पटू बनली होती. बुधवारी सायंकाळी ती तिची साथसंगत करणाऱ्या सायकलवरुच आजोबांकडे गेली. पण परतलीच नाही. अंगणात उभी असलेली एकाकी सायकल पाहिली तरी कोपर्डीच्या गावकऱ्यांचे डोळे डबडबून येतात.
कोपर्डीत पसरलेला सन्नाटा अजूनही दूर व्हायला तयार नाही. सगळे गाव अबोल झाले आहे. मंगळवारी गावात फेरफटका मारला. पण, कुठलाही गावकरी बोलण्याच्या मनस्थितीत नाही. आम्हाला सात दिवसांपासून अन्न गोड लागलेले नाही, असे गावकरी सांगतात. निर्भयाच्या वडिलांना कर्जतला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तर आईवरही आजोबाच्या घरात उपचार सुरु आहेत. रडून रडून आईच्या डोळ्यातील अश्रू देखील आटून गेले आहेत. आपल्या लाडक्या छकुलीच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. ‘ती शाळेत खूप हुशार होती. सगळे शिक्षक तिचे गुणगाण करायचे. मागील वर्षी नगरला खेळायला गेली होती,’ असे सांगत त्यांनी तिची सगळी प्रमाणपत्रे दाखविली. निर्भयाचे अभिनंदन करणारे क्रीडा अधिकाऱ्यांचे तसेच जिल्हा परिषद अध्यक्षांचे पत्रही त्यांनी समोर ठेवले. निर्भयाचे वडील शेती करतात. उदरनिर्वाहासाठी अलीकडेच त्यांनी एक हॉटेलही टाकलेय. गावापासून थोडी दूर ३०-४० घरांची लवण वस्ती आहे. तेथे सिमेंट पत्र्याच्या साध्या खोल्यांत हे कुटुंब राहते. निर्भयासह घरात तीन भावंडे. सर्वात मोठा भाऊ कर्जतला शिकत आहे. तर बहीण बारावीत आहे. ही घरात सगळ्यात लहान असल्याने लाडकी होती. बुधवारी सायंकाळी तिला आम्लेट खायचे होते. परंतु त्यासाठी घरात मसाला नव्हता. तो आणण्यासाठी आईने तिला आजोबांच्या घरी पाठविले. तिच्यासाठी आईने चहाही केला होता. परंतु लगेच आले असे सांगून ती गेली व पुढे वासनेची शिकार झाली.
निर्भया नववीत होती. त्यामुळे अजूनही ती बालपणाचा आनंदच लुटत होती. तिला दररोज शाळेत जाताना दहा रुपये हवे असायचे. त्यासाठी ती वडिलांकडे हट्ट करायची, एवढी ती अल्लड व निष्पाप होती. तिची रहाणीही टापटिपीत असायची. बुधवारी दुपारी आई शेतात कामाला गेली असताना तिने घरातील सर्व काम आवरले. सायंकाळी हातपाय धुवून आवरुन तिने मोबाईलमध्ये हौशीने आपला एक फोटोही काढला. हा तिचा शेवटचा फोटो ठरला. तिला फोटोची खूप आवड होती. आईकडे आता केवळ या आठवणी उरल्या आहेत. निर्भयाच्या शेजारी राहणाऱ्या महिलाही सांत्वन करण्यासाठी येणाऱ्यांना तिच्या अनेक आठवणी सांगतात. ‘आमच्या वस्तीसमोरच काही क्षणांत ती नाहिशी झाली. तिचा थेट मृतदेहच पहायला मिळाला, ’ असे एका शेजारी महिलेने सांगितले. कोपर्डी येथील मुली कुळधरण येथील शाळेत जातात. परंतु आला मुलींना शाळेत पाठविण्यास पालक घाबरत आहेत. बहुतांश मुलींनी सायकलचा प्रवास बंद करुन एस.टी.ने शाळेत जायला सुरुवात केली आहे. ज्या मुली सायकलवर जातात त्यांच्यासोबत काही पालक संरक्षक म्हणून जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. घरात देखील लहान मुली आई व आजीला चिकटून झोपतात एवढा या घटनेचा धसका घेण्यात आल्याचे रामभाऊ सुद्रीक यांनी सांगितले. परंतु आता या भितीवर मात करायला हवी, असेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Money should be eaten every day if it wants to be fearless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.