पारनेरमधून विधानसभेला पत्नीला मैदानात उतरवणार?; निलेश लंकेंचं चाणाक्ष उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 04:31 PM2024-08-08T16:31:49+5:302024-08-08T16:48:01+5:30

लोकसभा निवडणुकीपूर्वीही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निलेश लंके हे आपण पक्षांतर करणार नसल्याचं सांगत होते.

MP Nilesh Lanke reaction regarding Rani Lanke candidature from Parner Assembly Constituency | पारनेरमधून विधानसभेला पत्नीला मैदानात उतरवणार?; निलेश लंकेंचं चाणाक्ष उत्तर, म्हणाले...

पारनेरमधून विधानसभेला पत्नीला मैदानात उतरवणार?; निलेश लंकेंचं चाणाक्ष उत्तर, म्हणाले...

MP Nilesh Lanke ( Marathi News ) : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे जायंट किलर ठरले. लंके यांनी ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदारकीचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. निलेश लंके यांच्या राजीनाम्यामुळे पारनेर विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. मात्र आता विधानसभा निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पारनेरमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार नक्की कोण असणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत नवी दिल्ली इथं झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला निलेश लंके यांनी चाणाक्षपणे उत्तर देत आपले पत्ते लगेच खुले करण्यास नकार दिला आहे.

पारनेरमधील उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना निलेश लंके म्हणाले की, "आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असणार, हे ठरवणारा मी कार्यकर्ता नाही. प्रत्येक पक्षात नेतेमंडळी असतात. या नेत्यांकडून जो उमेदवार दिला जाईल, त्या उमेदवाराचं काम करणं ही माझी जबाबदारी आहे," असं उत्तर देत निलेश लंके यांनी शेवटी स्मितहास्य केलं.

राणी लंके यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

निलेश लंके हे अत्यंत सावधपणे आपली राजकीय पावलं टाकत असतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते आपण पक्षांतर करणार नसल्याचं सांगत होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस आधी त्यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. खरंतर सुरुवातीला त्यांनी लोकसभेसाठी पत्नी राणी लंके यांना उमेदवारी मिळवण्यासाठीच प्रयत्न सुरू केल्याचं दिसत होतं. त्यादृष्टीने मतदारसंघात होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या होर्डिंग्जवरही राणी लंके यांचे फोटो झळकू लागले होते. पंरतु ऐनवेळी निलेश लंके यांनी स्वत:च लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि हे मैदान मारत त्यांनी विजयही मिळवला. आता स्वत: खासदार झाल्यानंतर हक्काच्या पारनेर मतदारसंघात त्यांच्याकडून राणी लंके यांच्या उमेदवारीची मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे. 

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या नगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमातूनही याबाबतचे संकेत मिळाले होते. "लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना चांगली मते मिळाली. त्यामुळे आता विधानसभेत हीच जादू चालणार आहे. शिवसेना उपनेते साजन पाचपुते आणि खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या विधानसभेत जातील," असं वक्तव्य राऊत यांनी श्रीगोंदा येथील एका कार्यक्रमादरम्यान केलं होतं.
 

Web Title: MP Nilesh Lanke reaction regarding Rani Lanke candidature from Parner Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.