रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?; कर्जतच्या सभेतील वक्तव्याची राज्यभर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 09:49 PM2024-08-02T21:49:41+5:302024-08-02T21:51:27+5:30

रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या आपली मंत्रि‍पदाची इच्छा बोलून दाखवल्याचं बोललं जात आहे. 

ncp sp karjat jamkhed mla Rohit Pawar statement on maharashtra assembly election2024 | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?; कर्जतच्या सभेतील वक्तव्याची राज्यभर चर्चा

रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?; कर्जतच्या सभेतील वक्तव्याची राज्यभर चर्चा

NCP SP Rohit Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असून विधानसभा निवडणुकीत राज्यात मविआचीच सत्ता येईल, असा विश्वास या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. अशातच कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील लोकार्पण सोहळ्यात केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे

एमआयडीसीच्या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, "महाराष्ट्रात शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ३ महिन्यांनंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्यामुळे आपल्या एमआयडीसीच्या पेपरवर जर आताचे मंत्री सही करणार नसतील तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पवारसाहेबांच्या आशीर्वादाने आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याची सही एमआयडीसीच्या कागदावर असू शकते," असं म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या आपली मंत्रि‍पदाची इच्छा बोलून दाखवल्याचं बोललं जात आहे. 

नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार

कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आला होता. यावेळी अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नारायण आबा पाटील, साहेबराव नाना दरेकर यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते. 

दरम्यान, आमच्या पक्षाचे सर्व खासदार ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षा’चा संसदेतील आवाज बनून महाराष्ट्राचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतील आणि ते सोडवण्याचं काम करतील, असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: ncp sp karjat jamkhed mla Rohit Pawar statement on maharashtra assembly election2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.