भिंगार वेशीचा भाग ढासळला

By Admin | Published: August 26, 2014 11:11 PM2014-08-26T23:11:08+5:302014-08-26T23:21:42+5:30

भिंगार : भिंगार गावची शान असलेली, इतिहासाची साक्षीदार भिंगार वेशीचा काही भाग सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे.

The part of the Bhangar Gate was destroyed | भिंगार वेशीचा भाग ढासळला

भिंगार वेशीचा भाग ढासळला

googlenewsNext

भिंगार : भिंगार गावची शान असलेली, इतिहासाची साक्षीदार भिंगार वेशीचा काही भाग सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. वेशीच्या उर्वरित भागाला भेगा पडल्याने तोही भाग पडण्याच्या मार्गावर आहे. मुख्य बाजार पेठेत जाण्या-येण्यासाठी याच वेशीतून मार्ग असल्याने ही वेस धोकादायक ठरली आहे. वेस, हुतात्मा स्मारकाची नव्याने उभारणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
भिंगार गावचे वैभव असलेल्या भिंगार वेशीचा काही भाग सोमवारी झालेल्या पावसाने ढासळला आहे. अन्य भागास भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वेशीचा सदरचा भाग कधीही ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने रात्री उशिरापर्यंत वाहनांची ये-जा सुरू असते. याच वेशीत वाहतूक कोंडी वारंवार होते. वेशीजवळील साठ फूट उंचीचा वाळलेला वृक्ष कधीही उन्मळून पडण्याची भीती व्यक्त झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक भयभीत झाले आहेत. मघा नक्षत्राच्या पावसाने वादळी वाऱ्यासह शहराला झोडपल्याने डौलदार वृक्ष उन्मळून पडले आहेत. मात्र सुदैवाने त्यादरम्यान वाळलेला वृक्ष तग धरून राहिल्याने अनर्थ टळला. काही दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात त्याची एक फांदी शेजारील हनुमान मंदिराच्या छतावर पडली. पुढे पावसाळ्यात हा वृक्ष कोसळण्याचा धोका वाढला आहे. ज्या हुतात्म्यांनी स्वातंत्र्य संग्रामात प्राणार्पण केले, त्याच्या स्मृती सदैव स्मरणात आहेत. त्यासाठी १८ एप्रिल १९७६ रोजी भिंगारवेशीवर स्मारकस्तंभ उभारण्यात आला होता. वेस मोडकळीस आल्याने वेस,हुतात्मा स्मारकाची नव्याने उभारणी करून वाळलेला वृक्ष त्वरित काढण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे . मंगळवारी सकाळी बाळासाहेब पतके, सुनील लालबोंद्रे,संतोष बोबडे,प्रकाश लुणिया यांच्यासह अन्य नागरिकांनी छावणीचे सीईओ विलास पवार यांना या प्रश्नी निवेदन दिले आहे. (वार्ताहर)

Web Title: The part of the Bhangar Gate was destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.