लोकं व्यसनाधीन होऊन बरबाद झाली पाहिजेत, अण्णांचा राज्य सरकावर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 01:09 PM2022-01-31T13:09:52+5:302022-01-31T13:11:16+5:30

वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

People should be ruined by addiction, Anna Hajare's attack on the state government with wine in grocery store | लोकं व्यसनाधीन होऊन बरबाद झाली पाहिजेत, अण्णांचा राज्य सरकावर प्रहार

लोकं व्यसनाधीन होऊन बरबाद झाली पाहिजेत, अण्णांचा राज्य सरकावर प्रहार

Next

अहमदनगर/मुंबई - महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे. तर वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येतंय. मात्र, असे निर्णय ह्या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे, अशा शब्दात अण्णांनी राज्य सरकारच्या वाईन विक्री निर्णयावर जोरदार टीका केली आहे. 

वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते. शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमी भाव द्यायला हवा. पण त्याकडे रीतसर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाईनची खुली विक्री करून एक वर्षात 1 हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार?, असा सवालही अण्णांनी विचारला आहे. 
            
20 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या आणखी एका निर्णयात याच सरकारने आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्के केलेले आहे. उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करून हे मद्य स्वस्त करण्यात आले. यातून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल आणि सरकारला मिळणारा महसूल 100 कोटीवरून 250 कोटीवर जाईल, असा विचार सरकारने केल्याचे समजते. याचाच अर्थ लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास दिसून येतो. काल सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे तर सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत. केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देण्यासाठी सरकारने प्राधान्य देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी आहे, असेही अण्णांनी म्हटले. 
 

Web Title: People should be ruined by addiction, Anna Hajare's attack on the state government with wine in grocery store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.