मटका सुरू ठेवण्यासाठी पोलिसांची ‘आॅफर’

By admin | Published: April 24, 2016 10:57 PM2016-04-24T22:57:11+5:302016-04-24T23:14:26+5:30

अहमदनगर : शहराच्या मध्य भागात आणि सावेडीत मटका-जुगाराचे अड्डे सध्या तेजीत आहेत. पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी किरकोळ कारवाईच्या मागे आहेत.

Police's 'Affer' | मटका सुरू ठेवण्यासाठी पोलिसांची ‘आॅफर’

मटका सुरू ठेवण्यासाठी पोलिसांची ‘आॅफर’

Next

अहमदनगर : शहराच्या मध्य भागात आणि सावेडीत मटका-जुगाराचे अड्डे सध्या तेजीत आहेत. पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी किरकोळ कारवाईच्या मागे आहेत. शहराच्या जुन्या भागात तर पोलिसांनीच मटका सुरू ठेवण्यासाठी आॅफर दिली आहे. छोट्या अड्ड्यांवर कारवाई करणारे पोलीस मोठ्या अड्ड्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याने मटका तेजीत असल्याचे दिसते आहे.
शहरात गेल्या वर्षभरात एकही मोठा गुन्हा उघडकीस आणण्यात अपयश आलेले पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी मटका-जुगार खेळणारांना संरक्षण देत आहेत. मटका-जुगार अड्ड्यातून श्रीमंत झालेले गल्लीबोळातील पुढारी आता आर्थिकदृष्ट्या स्थिरावले आहेत. जमीन-जुमल्याचे व्यवहार, हॉटेल किंवा अन्य व्यवसायात ते गुंतले आहेत. त्यामुळे मटका चालविण्याबाबत त्यांची उदासिनता दिसते आहे. मटका अड्डे चालविणारे जुने मातब्बर अन्य व्यवसायांकडे वळाल्याने पोलिसांचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट काही पुढाऱ्यांना भेटूनच मटका अड्डा सुरू ठेवण्याची गळ घातली आहे. आम्ही तुम्हाला संरक्षण देतो. कोणतीही कारवाई करणार नाही. निवांत अड्डा चालू द्या, अशी आळवणी करताना पोलीस दिसत आहेत. पोलिसांकडून मटका सुरू ठेवण्याची आॅफर पाहून काही कार्यकर्ते चक्रावले आहेत. शहरात दुसरीकडे मोठ्या अड्ड्यांवर पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने मटका जुगार मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. यामध्ये तरुण वर्गही ओढला जात आहे. (प्रतिनिधी)
उपअधीक्षकांकडून मोठ्या कारवाया
शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी आतापर्यंत शहरातील मोठ्या मटका-जुगार अड्ड्यांवर कारवाया केल्या आहेत. अनेक जणांना अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बनसोडे यांना दिसणारे मटक्यांचे अड्डे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना का दिसले नाहीत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा अर्थ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या मटका अड्ड्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले असल्याचे दिसते. उलट पोलीस कर्मचारी मटका अड्डा चालकांच्या सावलीतच दिवस काढत असल्याचे चित्र आहे. पोलीस ठाण्यांचे अधिकारी जबाबदारी झटकत असल्याने अलीकडच्या काळात स्थानिक गुन्हे शाखेकडूनच मटका अड्ड्यांवर कारवाई सुरू आहे.
दोन पोलीस ठाण्यात शीतयुद्ध
शहरातील कोतवाली आणि तोफखाना ही दोन पोलीस ठाणी महत्त्वाची आहेत. शिवजयंती आणि रामनवमी या दिवशी निघालेल्या बेकायदेशीर मिरवणुकीवरून दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले होते. त्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने तोफखाना पोलीस ठाण्याला नमती भूमिका घ्यावी लागली होती. मिरवणूक तिकडे आणि गुन्हे आमच्या पोलीस ठाण्यात कसे? सर्व राजकीय पुढारी आमच्या अंगावर का सोडले? असा सवाल एका अधिकाऱ्याने केला होता. त्यामुळेच दोन्ही पोलीस ठाण्यात शीतयुद्ध भडकले होते. मात्र वरिष्ठांनी वेळीच लक्ष घातल्याने हे शीतयुद्ध थांबले.
आयपीएल सट्टाही तेजीत
सध्या आयपीएल क्रिकेट सामने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सावेडीत मोठ्या प्रमाणावर आयपीएलवर सट्टा लावला जात आहे. मात्र यावर पोलिसांचा कोणताही वचक असल्याचे दिसत नाही. कुठेही पाहणी, चौकशी करण्याचे साधे कामही पोलिसांकडून होत नसल्याने सट्टा तेजीत आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या सामन्यांच्यावेळी सावेडीत सट्टा बाजार सुरू असलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला होता. त्यामध्ये मोठी रक्कम आणि आरोपी पोलिसांच्या हाती लागले होते. यावेळी स्थानिक ठाण्याच्या पोलिसांना हा सट्टाबाजार कसा दिसला नाही? असा सवालही त्यावेळी केला होता.

Web Title: Police's 'Affer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.