पदवीधर मतदारांची विशेष मोहिमेकडे पाठ

By admin | Published: July 24, 2016 11:49 PM2016-07-24T23:49:21+5:302016-07-25T00:08:57+5:30

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेकडे मतदारांनी पाठ फिरविली आहे़

Read the special campaign of Graduate voters | पदवीधर मतदारांची विशेष मोहिमेकडे पाठ

पदवीधर मतदारांची विशेष मोहिमेकडे पाठ

Next

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेकडे मतदारांनी पाठ फिरविली आहे़ जिल्हाभरात दुसऱ्या दिवशी राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत एक हजार मतदारांनी अर्ज सादर केले असून, माहिती न देणाऱ्या मतदारांचा आकडा ‘जैसे थे’ आहे़ त्यामुळे ऐन निवडणुकीच्यावेळी मोठा पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत़
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक डिसेंबरमध्ये होत आहे़ निवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा निवडणूक शाखेकडून सुरू करण्यात आली आहे़ त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात मतदारयादी अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ या मोहिमेंतर्गत ज्या मतदारांचे जुन्या यादीत नाव आहे, त्यांनी छायाचित्रासह २० मुद्यांची माहिती सादर करणे अपेक्षित आहे़ मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून वेळोवेळी सूचना देवूनही अद्याप माहिती प्राप्त झाली नाही़ आतापर्यंत ७९ हजार मतदारांपैकी २५ हजार मतदारांचीच माहिती प्राप्त झाली आहे़ उर्वरित ५४ हजार मतदारांनी अद्याप छायाचित्र व इतर माहिती प्रशासनाकडे दिली नाही़ त्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने मंडलस्तरावर विशेष मोहीम हाती घेतली़ या मोहिमेचा रविवारी दुसरा दिवस होता़ पहिल्या दिवशी १ हजार १५७ अर्ज प्राप्त झाले़ दुसऱ्या दिवशीही माहिती देण्यासाठी मतदार घराबाहेर पडले नाहीत़ दिवसभरात १ हजार २५ मतदारांनीच छायाचित्र व इतर २० मुद्यांची माहिती दिली असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी दिली़
जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ही मोहीम राबविण्यात आली आहे़ महसूलच्या सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांनी शासकीय सुटी न घेता मोहीम राबविली़ मात्र मतदार माहिती घेऊन आले नाहीत़ त्याचबरोबर गावातून रिक्षाही फिरविण्यात आली़ परंतु मतदारांमध्ये निरुत्साही वातावरण असल्याचे यावरून स्पष्ट होते़ काही ठिकाणी तरी कर्मचाऱ्यांनी मतदारांच्या घरी जावून माहिती घेतली असल्याचे याविषयी माहिती देताना उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी सांगितले़ ते म्हणाले, जिल्ह्यात प्रभावीपणे ही मोहीम राबविण्यात आली़ माहिती न देणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे़ छायाचित्रासह मतदारयादी अद्ययावत करणे बंनधकारक आहे़ परंतु, जिल्ह्यात मतदारांकडून प्रतिसाद मिळत नाही़ मात्र निवडणुका जवळ आल्यानंतर हेच मतदार तक्रारी करतात़ त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विशेष मोहीम हाती घेण्यात आली़
(प्रतिनिधी)

Web Title: Read the special campaign of Graduate voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.