सुजय विखेंना धक्का?; भाजप संगमनेरमधून तिकीट नाकारण्याची शक्यता, कारणही आलं समोर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 05:22 PM2024-10-17T17:22:10+5:302024-10-17T17:54:44+5:30

संगमनेरमध्ये मागील अनेक वर्षांपासून दमदाटीचं राजकारण सुरू असून तालुक्याला परिवर्तनाची गरज आहे, त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास मी संगमनेरमधून निवडणूक लढवेन, अशी घोषणा सुजय विखेंनी केली होती. 

set back to Sujay Vikhe The possibility of BJP rejecting the ticket from Sangamner assembly constituency | सुजय विखेंना धक्का?; भाजप संगमनेरमधून तिकीट नाकारण्याची शक्यता, कारणही आलं समोर!

सुजय विखेंना धक्का?; भाजप संगमनेरमधून तिकीट नाकारण्याची शक्यता, कारणही आलं समोर!

BJP Sujay Vikhe ( Marathi News ) : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात असलेले भाजप नेते आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. कारण सुजय विखे यांना भाजपकडून उमेदवारी नाकारली जाऊ शकते. ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी विखेंकडून तयारी सुरू होती तो संगमनेर मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. तसंच सुजय विखे यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील शिर्डीतून विधानसभेच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना तिकीट नको, या मुद्द्यावरून भाजपकडून सुजय विखेंना विधानसभेचं तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर सुजय विखे यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांना आव्हान दिले होते. संगमनेरमध्ये मागील अनेक वर्षांपासून दमदाटीचं राजकारण सुरू असून तालुक्याला परिवर्तनाची गरज आहे, त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास मी संगमनेरमधून निवडणूक लढवेन, अशी घोषणा त्यांनी केली होती. 

लोकसभा निवडणुकीनंतर काय म्हणाले होते सुजय विखे?

"मला आता वेळ आहे. शेजारी कुठे संधी मिळाली, तर विधानसभा लढवण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्या मतदारसंघात माझ्या नावावर एकमत होईल, तिथून निवडणूक लढवण्यास तयार आहे. श्रीरामपूर राखीव असल्याने संगमनेर आणि राहुरी हेच माझ्यासमोर पर्याय आहेत", असं सुजय विखे म्हणाले होते. मात्र आता महायुतीतील संगमनेरच्या जागेचा तिढा आणि एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींनी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरून सुजय विखेंना तिकीट नाकारलं जाईल, असे समजते.

काँग्रेसकडून संगमनेरमधून कोण लढणार...बाळासाहेब थोरात की जयश्री थोरात? 

बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून १९८५ पासून निवडून येत आहे. नऊ वेळा त्यांनी विधानसभेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांची मुलगी जयश्री थोरातही राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्या निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा अधूनमधून होत असते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत संगमनेरमधून काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, याबद्दलही उत्सुकता आहे.

Web Title: set back to Sujay Vikhe The possibility of BJP rejecting the ticket from Sangamner assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.