नगर शहरात आता स्मार्ट सुरक्षा!

By admin | Published: April 24, 2016 11:05 PM2016-04-24T23:05:58+5:302016-04-24T23:13:13+5:30

अहमदनगर : पोलीस दलाच्या पुढाकाराने शहरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

Smart security comes in city! | नगर शहरात आता स्मार्ट सुरक्षा!

नगर शहरात आता स्मार्ट सुरक्षा!

Next

अहमदनगर : पोलीस दलाच्या पुढाकाराने शहरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच गुन्हा घडणार नाही, याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नागरिकांनी सुरक्षेबाबत काय काळजी घ्यावी, यासाठी चौकाचौकात सार्वजनिक उद्घोषणा करणारी ध्वनी यंत्रणा (पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टिम) लवकरच बसविण्यात येणार आहे. यामुळे नगर शहर आता सुरक्षेच्या दृष्टिने स्मार्ट सिटी होणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी नगर शहराला सुरक्षेच्या दृष्टिने स्मार्ट करण्यासाठी पाऊल उचलले आहे. सर्वात आधी प्रत्येक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आता सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठ, मुख्य रस्ते, वसाहती आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. गुन्हा टाळता येत नसला तरी घडलेल्या गुन्ह्याचा तपास वेगाने होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तत्काळ उपयोग होत असल्याने अनेक गुन्ह्यांचा उलगडा होताना दिसून आले आहे. अपार्टमेंट, सोसायटी आणि व्यापाऱ्यांनाही कॅमेरे बसविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरात कॅमेरे बसविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्रिपाठी यांनी व्यक्त केली.
प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रारदारांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांसाठी खास पोलीस दलाने फेसबुक पेज सुरू केले आहे. नगर जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळही कार्यान्वीत करण्यात आले असून त्यावर नागरिक भेट देत आहेत. तक्रारी देण्यासाठी व्हॉटस् अ‍ॅप नंबरची घोषणा केलेली आहे. फेसबुक पेजवरून नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले जाते. हेच मार्गदर्शन किंवा उपाययोजनांबाबतची माहिती आता चौकाचौकातील सिग्नलवरून ऐकविण्यात येणार आहे. त्यासाठी उद्घोषणा करणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेच्या खर्चासाठी जिल्हा नियोजनला प्रस्ताव देण्यात आला आहे. ही यंत्रणा नगर शहरात लवकरच ती कार्यान्वीत करण्यात येणार असल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गस्तीसाठी फिरणाऱ्या वाहनांना व्हेकल ट्रॅकिंग सिस्टिम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणते पोलीस कर्मचारी कुठे काम करतात, याची माहिती मिळणार आहे. (प्रतिनिधी)
सायबर लॅब मंजूर
राज्यात पाच ठिकाणी सायबर लॅब स्थापन करण्याची शासनाने घोषणा केली आहे. त्यातील पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये अहमदनगर शहराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा उलगडा नगरमध्ये करणे शक्य होणार आहे. यामुळे पोलीस दलाचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
डिजिटल रेकॉर्ड
प्रत्येक गुन्ह्याचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. सीसीटीएनएस प्रोजेक्ट हा प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला होता. त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याने सध्या हा प्रकल्प बंद आहे. दिल्ली येथूनच सर्व्हर बंद आहे. सर्व पोलीस ठाण्यांचे संगणकीकरण झाल्याने आणि सर्व्हर सुरू झाल्यानंतर सर्व पोलीस ठाणे आॅनलाईन दिसणार आहेत. जिल्ह्यात किती तक्रारी आहेत, कोणत्या तक्रारी कशा आहेत, याबाबत तपशीलवार डाक्युमेंटरी केली जाणार आहे. या रेकॉर्डमधून गुन्हेगार शोधण्यास मदत होणार आहे.

Web Title: Smart security comes in city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.