भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध केले नाहीतर राजकारणातून बाजूला व्हा; विखे-पाटलांचे थोरातांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 11:19 PM2024-08-03T23:19:02+5:302024-08-03T23:19:57+5:30

दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.

Step aside from politics if allegations of corruption are proven says Vikhe Patil | भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध केले नाहीतर राजकारणातून बाजूला व्हा; विखे-पाटलांचे थोरातांना आव्हान

भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध केले नाहीतर राजकारणातून बाजूला व्हा; विखे-पाटलांचे थोरातांना आव्हान

प्रशांत शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : "तलाठी भरतीमध्ये पैशांचा व्यवहार झाला असा आरोप करीत व्यवस्था बदनाम करण्याचा दुर्दैवाने प्रयत्न झाला. पण, सरकारचा पारदर्शक कारभार असल्याने पहिल्यांदाच तलाठी भरती इतक्या पारदर्शक पद्धतीने पार पडली. त्यामुळे माजी महसूलमंत्र्यांना आव्हान आहे की एकदा साईबाबांकडे या आणि बाबांच्या शपथेवर सांगा, भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचाराचे एक उदाहरण जरी मिळाले तरी मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा," असे जाहीर आव्हान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांना दिले.

अहमदनगर शहरातील सहकार सभागृहात शनिवारी (दि. ०३) महसूल विभागाकडून आयोजित कार्यक्रमात विखे-पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह नवीन नियुक्त तलाठी, पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या जिल्ह्यातील दोन महाभागांनी तलाठी भरती घोटाळ्यांवर माझ्यावर आरोप केले. त्यामध्ये माजी महसूलमंत्री आणि एक विद्यमान आमदार होते. त्यावेळी आम्ही विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला होता. परंतु, संपूर्ण आरोपाला उत्तर म्हणून सर्व जिल्ह्यातील तलाठी उमेदवारांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना मोठी चपराक लागली आहे. याचे मला समाधान आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

माजी महसूलमंत्र्यांकडे तलाठी, प्रांत अधिकारी यांच्या बदलीचे रेटकार्ड होते. आज पहिल्यांदा पारदर्शकपणे नियुक्त आणि अधिकाऱ्यांना बढती मिळाल्या आहेत. ज्यांच्या बुडाखाली अंधार, ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो याचे भान ठेवले पाहिजे, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.

Web Title: Step aside from politics if allegations of corruption are proven says Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.