‘मोहटा’ प्रकरणी कारवाईचा अहवाल सादर करा : खंडपीठाचे पोलीस अधीक्षकांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:17 AM2019-07-12T10:17:30+5:302019-07-12T10:25:21+5:30

मंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सोन्याचे सुवर्ण यंत्रे बनवून ते पुरले. अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वत: लक्ष घालून दाखल तक्रारीवर काय कारवाई केली? असा सवाल करीत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कारवाईबाबतचा शपथेवरचा अहवाल २४ जुलैपर्यंत न्यायालयात दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

Submit report on action in 'Mohta' case: Order by court S.P. Ahmednagar | ‘मोहटा’ प्रकरणी कारवाईचा अहवाल सादर करा : खंडपीठाचे पोलीस अधीक्षकांना आदेश

‘मोहटा’ प्रकरणी कारवाईचा अहवाल सादर करा : खंडपीठाचे पोलीस अधीक्षकांना आदेश

ठळक मुद्देमंदिरात सुवर्ण यंत्रे पुरल्याचे प्रकरणमंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सोन्याचे सुवर्ण यंत्रे बनवून ते पुरलेमजुरीही ही सोन्याच्या किमतीपेक्षा तुलनेत जास्त‘लोकमत’ने उघडकीस आणले प्रकरणअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती.दोन वर्ष उलटूनही आजपर्यंत काहीच कारवाई झालेली नाहीन्यायालयाने पोलिसांनी आजपर्यंत काहीच कारवाई न केल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अहवाल २४ जुलैपर्यंत न्यायालयात दाखल करण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वत: याप्रकरणी लक्ष घालावेमोहटादेवी हे राज्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे. या देवस्थानचे जिल्हा न्यायाधीश हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट यांनी मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सोन्याचे सुवर्ण यंत्रे बनवून ते पुरले. अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वत: लक्ष घालून दाखल तक्रारीवर काय कारवाई केली? असा सवाल करीत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कारवाईबाबतचा शपथेवरचा अहवाल २४ जुलैपर्यंत न्यायालयात दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
मोहटा देवस्थानतर्फे मोहटादेवी मंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सोन्याचे सुवर्णयंत्रे पंडित जाधव यांच्याकरवी मंत्रोच्चारात पुरले. तसेच देवस्थानमधील आर्थिक अनियमिततेबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, रंजना गवांदे, बाबा आरगडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. या प्रकरणी विश्वस्तांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र पोलीस अधीक्षकांनी कोणतीही कारवाई न केल्याने नामदेव गरड यांनी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेत हस्तक्षेप करीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही कारवाई होत नसल्याबाबत न्यायालयाचे लक्ष वेधले. याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. या दरम्यान न्यायमूर्ती टी.व्ही.नलावडे व के.के.सोनवणे यांनी वरील आदेश दिला.
२८ जून रोजी देवस्थानने मंदिरात सोने पुरल्याप्रकरणी अंनिसच्या तक्रारीवर पोलिसांनी काय कारवाई केली? याबाबत अहवाल न्यायालयाने मागितला होता. यावर न्यायालयात पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी सदर प्रकरणी चौकशीसाठी आणखी एक महिन्याचा कालावधी मागितला. त्यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील अजिंक्य काळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या तक्रारीवर काय कारवाई केली, याची २०१७ मध्ये माहिती अधिकारात पोलीस अधीक्षकांना माहिती विचारली होती. त्यावर चौकशी चालू असल्याचे उत्तर मिळाले होते. परंतु यास दोन वर्ष उलटूनही आजपर्यंत काहीच कारवाई झालेली नाही, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. सदरील प्रकार हा गंभीर आहे. जनतेच्या पैशाचा अपव्यय करणे व कारवाईस टाळाटाळ करणे ही बाब गंभीर असल्याचे मत यावेळी न्यायालयाने नोंदवले.
देवस्थानने मंदिरात पुरलेल्या सुवर्ण यंत्राची मजुरीही २४ लाख ८५ हजार होत असून सदरील मजुरीही ही सोन्याच्या किमतीपेक्षा तुलनेत जास्त होत आहे. कोणताही सोनार १० ते १५ टक्के पेक्षा जास्त मजुरी घेत नाही. परंतु सुवर्णयंत्रे बनवताना ५० टक्के मजुरी घेतली. ही बाब जनतेच्या पैशाचा अपव्यय असल्याचे सांगितले.
यावेळी न्यायालयाने पोलिसांनी आजपर्यंत काहीच कारवाई न केल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या २४ जुलैपर्यंत अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वत: याप्रकरणी लक्ष देऊन सोने पुरल्याबाबत दाखल तक्रारीवर आजपर्यंत काय कारवाई केली ? अथवा कारवाई का केली नाही? याचा खुलाशासह शपथेवर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षकांनी वेळीच अहवाल सादर केला नाही तर न्यायालय याबाबत गंभीर दखल घेऊन पुढील आदेश करील असे देखील आदेशित केले आहे.
याचिकाकर्ते नामदेव गरड यांच्या वतीने अ‍ॅड. सतीश तळेकर, अजिंक्य काळे, अविनाश खेडकर हे बाजू मांडत असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नजम देशमुख हे बाजू मांडत आहेत.

निविदा न काढताच यंत्रे पुरली
मोहटादेवी हे राज्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे. या देवस्थानचे जिल्हा न्यायाधीश हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार करताना १ किलो ८९० ग्रॅम सोन्याचे योगिनी यंत्रे तयार करून ती मंदिर परिसरात मंत्रोचारात विधीवत बसवण्याचा ठराव २०१० मध्ये करण्यात आला. यंत्रे विविध मूर्ती खाली पुरण्यात आली आहेत. ही यंत्रे तयार करणे व मंत्र उच्चारासाठी सोलापूरचे पंडित प्रदीप जाधव यांना तब्बल २४ लाख ८५ हजार रक्कम देण्यात आली आहे. याशिवाय वास्तुविशारद यांच्या प्रस्तावावरून हे सर्व काम कुठलीही निविदा न काढता करण्यात आले.

‘लोकमत’ने उघडकीस आणलेले प्रकरण
‘लोकमत’ ने २०१७ साली ‘मोहट्याची माया’ या मालिकेद्वारे सुवर्णयंत्रे पुरल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने २०१७ मध्ये नगरच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. या प्रकाराबाबत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु त्यावर अद्यापपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही.



 

Web Title: Submit report on action in 'Mohta' case: Order by court S.P. Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.