बिबट्याच्या अंत्यसंस्कारात तस्करीचा संशय!

By admin | Published: April 25, 2016 11:07 PM2016-04-25T23:07:35+5:302016-04-25T23:21:04+5:30

अरुण वाघमोडे, अहमदनगर नगर जिल्ह्यात मागील तीन वर्षांत ४७ तर गेल्या महिनाभरात ४ अशा एकूण ५१ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे़

Suspicion of leopard funeral! | बिबट्याच्या अंत्यसंस्कारात तस्करीचा संशय!

बिबट्याच्या अंत्यसंस्कारात तस्करीचा संशय!

Next

अरुण वाघमोडे,  अहमदनगर
नगर जिल्ह्यात मागील तीन वर्षांत ४७ तर गेल्या महिनाभरात ४ अशा एकूण ५१ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे़ बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागातील कर्मचारी शवविच्छेदन करून त्याचे दहन करतात़ दहन करतेवेळी मात्र, स्थानिक ठिकाणचे पंच बोलविणे वन कायद्यात बंधनकारक नसल्याने बिबट्याच्या अंत्यसंस्काराचे साक्षीदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ यामुळे बिबट्याच्या कातडीच्या तस्करीची शंका बळावली आहे.
वन कायद्यात क्रमांक एकमध्ये गणल्या जाणाऱ्या बिबट्याची कातडी व इतर अवयवांची विविध ठिकाणी मोठी तस्करी होते़ अशा परिस्थतीत मृत्यू झालेल्या बिबट्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे़ बिबट्याचे दहन करताना बहुतांशीवेळा वन विभागातील कर्मचारी गोपनीयता पाळतात़ ऐनवेळी स्थानिक ग्रामस्थ न भेटल्याचे कारण सांगत बिबट्याचे दहन केले जाते़ त्यामुळे बिबट्याच्या अत्यंसंस्काराबाबतच संशय व्यक्त होत आहे़ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून प्रमाणपत्र दिल्यानंतर बिबट्याचे दहन केले जाते़ मात्र, बहुतांशीवेळा दहन करतेवेळी पशुवैद्यकीय अधिकारीही तेथे उपस्थित राहत नसल्याचे समोर आले आहे़ अशावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले वन कर्मचारीच बिबट्याचे दहन करतात़
वन कायद्यात क्रमांक एकमध्ये गणल्या जाणाऱ्या बिबट्याला सर्वोच्च संरक्षण देण्याची जबाबदारी वन विभागाची आहे़ प्रत्यक्षात मात्र, वनक्षेत्र घटले असून बिबट्यांची संख्या वाढली आहे़पाणी, चाऱ्याच्या शोधात फिरणारे बिबटे पशुधनासह मानवावरही हल्ले करत आहेत, तर कधी बिबट्यांनाही जीव गमवावा लागत आहे़
शिकारी झाला दुष्काळाची शिकार
मागील दीड महिन्यात जिल्ह्यात अकोले तालुक्यात १० मार्चला धामणगाव आवारी येथे बिबट्याचा अन्न न मिळाल्याने मृत्यू झाला. ३१ मार्चला वीरगाव येथे साडेतीन वर्षाच्या बिबट्याचा तर २ एप्रिलला सुगाव बुद्रूक येथे नदीपात्रात पाण्यात बुडून पाच ते सहा वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झाला़ २४ एप्रिलला राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर परिसरात अन्न, पाण्यावाचून बिबट्याचामृत्यू झाला़
वनविभागाकडे बिबट्याच्या अंत्यसंस्काराची नियमावली असून,त्यानुसार अंत्यसंस्कार करणे बंधनकारक आहे़ बिबट्यावर अंत्यसंस्कार करताना मात्र, स्थानिक ठिकाणचे पंच बोलविणे बंधनकारक नाही़ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांडून शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याचे दहन करण्याची सर्वस्वी जबाबदारी वनकर्मचाऱ्यांचीच आहे़
-अरविंद पाटील, उपवनसंरक्षक, नाशिक विभाग
राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर परिसरात रविवारी (२४) अन्न,पाणी न मिळाल्याने बिबट्याचा मृत्यू झाला़ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी गावातील दोन पंच बोलविण्यात आले होते़
-दशरथ झिंजुर्के, वनसंरक्षक, शिर्डी

Web Title: Suspicion of leopard funeral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.