वाहन फिटनेस दंड रद्द करण्यासाठी वाहतूक संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 03:25 PM2024-06-20T15:25:34+5:302024-06-20T15:26:01+5:30

दंड न हटवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा वाहतूक संघटनांनी दिला आहे.

Traffic unions aggressively march on Collector s office to cancel vehicle fitness penalty | वाहन फिटनेस दंड रद्द करण्यासाठी वाहतूक संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वाहन फिटनेस दंड रद्द करण्यासाठी वाहतूक संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रशांत शिंदे

अहमदनगर- पंधरा वर्षाच्या आतील वाहनास, ऑटो रिक्षा, विद्यार्थी वाहतूक करणारी बस, मिनी बस आदी वाहन चालकांकडून दररोज पन्नास रुपये फिटनेस लेट दंड आकारण्यात येत आहे. हा नियम रद्द करण्याची मागणी जिल्हा ऑटो रिक्षा, मिनीबस संघटना यांच्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे. तर दंड न हटवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा वाहतूक संघटनांनी दिला आहे.

आज (शुक्रवारी) सकाळी अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये जिल्ह्यातील विविध वाहन वाहतूक संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी खासदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते बाबा अरगडे, अविनाश घुले, वैभव जगताप, विलास कराळे, बबनराव बारस्कर, सुनील रासकर, दत्ता वामन, अशोक औशिकर, गुलाम दस्तगीर बाबा, भैय्या पठाण, समीर कुरेशी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मोटार वाहन व्यावसायिकांकडून वाहन फिटनेस लेट पन्नास रुपये रोज दंड आकारण्यात येत आहे. परंतु हा दंड ऑटो रिक्षा, मिनी बस यांना परवडणारा नाही. त्यांच्यावर हा अन्याय आहे. हा दंड केंद्र सरकार व राज्य सरकारने रद्द करावा, राज्यातील ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक यांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी महामंडळाचे कामकाज सुरू करावे. ऑटो रिक्षाचे खुले परवाने धोरण मागे घ्यावे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑटो रिक्षा, विद्यार्थी वाहतूक करणारे वाहने यांच्या पासिंगसाठी मदतनीस नेमावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी खासदार लंके व आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वाहनधारकांच्या मागणीबाबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या मागणीबाबत लंके यांनी येत्या संसदेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून केंद्रीय परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करू सांगितले. आमदार संग्राम जगताप यांनी देखील विधानसभेच्या अधिवेशनामध्ये वाहनधारकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला जाईल, असे आश्वासन दिले.

Web Title: Traffic unions aggressively march on Collector s office to cancel vehicle fitness penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.