कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिध्दीत पर्यटकांना मज्जाव; अण्णा हजारे भेटणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:50 PM2020-03-13T18:50:36+5:302020-03-13T18:52:23+5:30
राळेगणसिद्धी येथे ग्रामविकासाचे कार्य पाहण्यासाठी व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. कोरोना व्हायरवर उपाय म्हणून पर्यटकांनी सध्या राळेगणसिद्धीत येऊ नये, असे आवाहन शुक्रवारी राळेगणसिद्धी परिवाराने केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सुध्दा सध्या कुणालाही भेटणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
पारनेर : राळेगणसिद्धी येथे ग्रामविकासाचे कार्य पाहण्यासाठी व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. कोरोना व्हायरवर उपाय म्हणून पर्यटकांनी सध्या राळेगणसिद्धीत येऊ नये, असे आवाहन शुक्रवारी राळेगणसिद्धी परिवाराने केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सुध्दा सध्या कुणालाही भेटणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
भारतातही कोरोना व्हायरसने प्रवेश केला आहे. महाराष्ट्र राज्यातही या रोगाने शिरकाव केलेला आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने आणि जीवघेणा असल्याने संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही राळेगणसिद्धी परिवाराने हा निर्णय घेतला आहे. हा रोग आटोक्यात येत नाही तोपर्यंत राळेगणसिद्धीमध्ये पर्यटकांनी येऊ नये. आजपर्यंत राळेगणसिद्धी येथे १६ लाखापेक्षा जास्त पर्यटक राज्य व देश-विदेशातून आलेले आहेत. विशेषत: अण्णा हजारे यांच्याबरोबर छायाचित्र काढून घेण्याची पर्यटकांची अपेक्षा असते.
कोरोना विषाणू एका व्यक्तीकडून दुसºया व्यक्तीत संक्रमित होत असल्याने त्याचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे गाव, परिसर, राज्य व देशातील लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने खबरदारी म्हणून पर्यटकांनी कोरोना रोगाची सुधारणा होईपर्यंत राळेगणसिद्धीला येण्याचे टाळावे, अशी प्रेमाची विनंती राळेगणसिध्दी परिवाराने केली आहे. त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी कोरोनाला न घाबरता धैर्याने तोंड देण्यासाठी जे जे पथ्य सांभाळावे लागतात ते सांभाळावे. म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.