सात लाख जनावरांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:21 PM2019-05-10T12:21:55+5:302019-05-10T12:22:23+5:30
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील जनावरांची लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे़
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील जनावरांची लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे़ ८ मे पर्यंत ७ लाख १८ हजार ९४१ जनावरांना लाळ खुरकुत रोगाच्या प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत़ या लसीकरणातून सेवा शुल्कापोटी ६ लाख ७१ हजार ९११ रुपये जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा झाले आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ सुनील तुंबारे यांनी दिली़
प्रत्येक सहा महिन्याला जनावरांचे लसीकरण करण्यात येते़ सध्या जिल्ह्यातील ४९१ छावण्यांमध्ये ३ लाख ७ हजार जनावरे दाखल आहेत़ छावण्यांमध्ये जाऊन तसेच घरोघर जाऊन पशुसंवर्धन विभागाकडून लाळ खुरकुत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे़ ७३ पशुधन विकास अधिकारी, १४७ पशुधन पर्यवेक्षक, ४२ सहाय्यक पशुधन विकास अधिकारी हे लसीकरण करीत आहेत़ या लसीकरणात नोंदणीकृत १ हजार २५६ खासगी पशुवैद्यक मदत करीत आहेत़ आत्तापर्यंत ५७ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित लसीकरण २० मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असे डॉ़ तुंबारे यांनी सांगितले़
लाळ खुरकुत हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे छावणीतील जनावरांची तपासणी मोहीम पशुसंवर्धन विभागाच्यावतीने हाती घेण्यात आली आहे़ छावण्यांना भेटी देऊन जनावरांचे लसीकरणही करण्यात येत आहे़ ज्या जनावरांना लाळ खुरकुत रोगाची लागण झाली असेल, अशा जनावरांना छावणीतून वेगळे काढून ठेवण्यात येत आहे, असे डॉ़ तुंबारे यांनी सांगितले़