गुंडगिरी विरूध्द राहुरीत विराट मोर्चा

By admin | Published: August 20, 2016 01:02 AM2016-08-20T01:02:12+5:302016-08-20T01:04:03+5:30

राहुरी : राहुरी शहर व तालुक्यात गुंडगिरी करणारांनी सर्वसामान्यांचे जीणे मुश्कील केले आहे़ बिहार सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने वैतागलेल्या नागरिकांनी शुक्रवारी विराट मोर्चा काढला़

Virat Morcha against Gundagiri | गुंडगिरी विरूध्द राहुरीत विराट मोर्चा

गुंडगिरी विरूध्द राहुरीत विराट मोर्चा

Next

राहुरी : राहुरी शहर व तालुक्यात गुंडगिरी करणारांनी सर्वसामान्यांचे जीणे मुश्कील केले आहे़ बिहार सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने वैतागलेल्या नागरिकांनी शुक्रवारी विराट मोर्चा काढला़ कुठलेही आवाहन न करता, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळला व मोर्चेकऱ्यांना पाठींबा दर्शविला़ शेतकरी अपहरण प्रकरणातील आरोपीला अटक करण्याचे आश्वासन व अवैध व्यवसाय बंद करण्याचे संकेत दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़
राहुरी येथील बालाजी मंदिरासमोर असलेल्या प्रांगणात मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमा झाल्याने नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली़ हातात फलक व भगवे ध्वज घेऊन विराट मोर्चा राहुरी शहरातून काढण्यात आला़ गुंड प्रवृत्तीविरूध्द घोषणा देत मोर्चा राहुरी तहसील कचेरीवर धडकला़
मोर्चाचे रूपांतर सभेत झाले़ तहसील समोर असलेले प्रांगण कमी पडल्याने मोर्चेकऱ्यांनी झाडावर व वाहनांच्या टपावर बसून भाषणे ऐकली़ गुंड प्रवृत्तीवर वक्त्यांनी घणाघाती टीका केली़ प्रास्ताविकात राजू शेटे यांनी संभाजी उगले अपहरण प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करावी, बारागाव नांदूर येथील गुंडांचा बंदोबस्त करावा, वाळू उचलेगिरी, मटका यांचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला़
शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर यांनी खोट्या अ‍ॅट्रॉसीटी दाखल करू नयेत अन्यथा सर्व गावकरी एकीने प्रतिकार करतील, असा इशारा दिला़ मुळा नदी पात्रात असलेला पूल उघडा पडल्याबद्दल संभाजी तनपुरे यांनी टीका केली़
मोर्चेकऱ्यांना सिंधुबाई पवार, प्रतिभा जऱ्हाट, देवेंद्र लांबे, कृषिराज टकले, रवींद्र मोरे, प्रकाश देठे, मच्छिंद्र डोळकर, बाळासाहेब पवार आदींनी मार्गदर्शन केले़ उपविभागीय अधिकारी पी़ एम़ बावीस्कर यांना निवेदन देण्यात आले़
मोर्चामध्ये विचारलेल्या प्रश्नांना तहसीलदार अनिल दौंडे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी उत्तरे दिली़ वाळू उचलेगिरीविरूध्द मोहीम हाती घेण्यात आली असून गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार दौंडे यांनी दिले़ आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक वाघ यांनी दिले़ दारू, वाळू तस्करी व मटक्याचा बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली़
(तालुका प्रतिनिधी)
राहुरीत मोर्चेकऱ्यांचा उच्चांक
ऊस झोन प्रश्नी ३२ वर्षापूर्वी राहुरी येथे मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते़ त्यागर्दीचा उच्चांक शुक्रवारच्या मोर्चाने मोडून काढला़ हा विषय तालुक्यात चर्चेचा ठरला़ जागा कमी पडल्याने मिळेल तेथे बसून नागरिक भाषणे ऐकत होते़

Web Title: Virat Morcha against Gundagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.