शिवारात पाणी

By Admin | Published: July 29, 2016 05:54 PM2016-07-29T17:54:50+5:302016-07-29T17:55:46+5:30

अहमदनगर : गाव शिवारातून वाहून जाणारे लाखो लिटर पावसाचे पाणी गावातच साठविण्याची किमया जलयुक्त शिवारने साधली आहे़ गेल्या तीन वर्षात निर्माण झालेली पोकळी यामुळे काहीश भरून निघण्यास मदत झाली

Water in Shivar | शिवारात पाणी

शिवारात पाणी

googlenewsNext

अहमदनगर : गाव शिवारातून वाहून जाणारे लाखो लिटर पावसाचे पाणी गावातच साठविण्याची किमया जलयुक्त शिवारने साधली आहे़ गेल्या तीन वर्षात निर्माण झालेली पोकळी यामुळे काहीश भरून निघण्यास मदत झाली असून, गावोगावच्या शिवारात पाणीच पाणी चोहीकडे, असे चित्र पाहायला मिळत आहे़
‘लोकमत’च्या जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी गुरुवारी गावांना भेटी देवून जलयुक्तच्या कामांचे एकप्रकारे आॅडीच केले आहे़ त्याचा हा रिर्पाट सादर करण्यात आला आहे़
गेल्या वर्षभरात २७९ गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले़ जलसंधारणाची कामे करण्याआधी गावाच्या शिवारात फेरी घेवून आराखडा तयार करण्यात आला़ हा आराखडा ग्रामसभेत सादर करून त्यास अंतिम मंजूरी घेण्यात आली़ सरकाच्या प्रकल्पावर तहान लागल्यानंतर खड्डे खोदले जात असल्याची टिकाही झाली़ मात्र पाऊस पडल्यानंतर या कामांचा परिणाम दिसू लागला आहे़ बहुतांश गावांतील शिवार जलयुक्त झाले असून, पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे़ जलयुक्त शिवार अभियानासाठी निवडलेल्या जिल्ह्यातील २७९ गावांत १४ हजार ४९१ कामे हाती घेण्यात आली होती़ त्यापैकी १३ हजार ९४७ कामे पूर्ण झाली आहेत.पावसाने दमदार हजेरी लावल्याने माती नाला बांध, नाला खोलीकरण, शेततळे, जलस्त्रोतांची दुरुस्ती आणि शेततळ्यांत एकूण ५६ हजार ५६८ टीसीएम पाणी साठले गेले आहे़ म्हणजेच दोन टीएमसी पाणीसाठा यामुळे उपलब्ध झाला आहे़ जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मातीनाला बांधातील गाळ काढणे, मातीनाला बांध, नाला खोलीकरण, जलस्त्रोतांची दुरुस्ती, सलग समपातळी चर, खोल सलग समपातळी चर, कंपार्टमेंट बंडिंग आदी कामांमुळे पाणीपातळीत वाढ होण्यास मोठी मदत झाली आहे़
ठिकठिकाणी पाणी साठल्यामुळे त्याचा वापर परिसरातील शेतीसाठी करणेही शक्य होणार आहे़ पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहिल्यास पाणीसाठ्यात मोठी वाढ होईल़ नगर जिल्हा गेल्या तीन वर्र्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे़आता चित्र पालटले असून, पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे़ या पावसामुळे जलयुक्त शिवार अभियानाचे दृष्य परिणाम दिसू लागला आहे़
(प्रतिनिधी)
दोनशे कोटी खर्च
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये १३ हजार कामे पूर्ण करण्यात आली असून,या कामांवर १८९ कोटी रुपये खर्च झाले असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते़
जलयुक्त शिवारातंर्गत
झालेली कामे
गाळ काढणे- १,११
बांधिस्ती- २३६९
मातीचे बांध-३०
लुज बोर्डर स्ट्रक्चर-२२३
शेततळे- ६४१
साठवण तलाव-१०६
सिमेंट नालाबांध- ३५३
नाल्यांची दुरुस्ती५३१
वनतळे- २१४
नाले दुरुस्ती-९०
वृक्ष लागवड-९०
विहीर पुर्नीरण-८८४
नाला खोलीकरण-४४४
खोल समपातळी चर-५०८
समपातळी चर-१०५
बांध बळकटीकरण-४०
रिचार्ज शाप्ट- ३५९
इंधन विहीर जलभंजन-६९
के़टी़ वेअर-४
वनराई बंधारे-१,६४३
रस्ता दुतर्फा वृक्षलागवड-२४
ठिबक संच- ४१९०
शासकीय जागेत वनीकरण-१०
गॅबियन स्ट्रक्चर -११७
रिचार्ज ट्रँच-१४
इतर- १२६
जामखेडला नवसंजीवनी
जामखेड : गेल्या चार वर्षांपासून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवून परिसरातील गावांची पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी युती सरकारने गेल्या वर्षापासून जलयुक्त शिवार योजना सुरू केल्यानंतर तालुक्यातील ८९ गावांपैकी ७५ गावांचा समावेश या योजनेत आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम जाणवला नाही. यावेळी जुलैच्या शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्यानंतर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे तालुक्याला ही योजना नवसंजीवनी ठरत आहेत.
तालुक्यातील ४१ गावांत प्रत्यक्षात लोकसहभागातून विविध भूसुधारांची कामे घेतली आहे. याशिवाय जुन्या जल स्त्रोतांतील गाळ काढणे, त्यांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, नवीन सिमेंट बंधारे करणे आदी कामांचाही कृती आराखडा तयार केला आहे. तालुका कृषी कार्यालयाच्या कार्यकक्षेतील विविध पाणलोट क्षेत्रात एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पांतर्गत २३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कंपार्टमेंट बंडिंगची कामे झाली. प्रति हेक्टर ०.२० टीएमसी तर एकंदर ४७० टीएमसी पाणीसाठा यामुळे होईल. सलग समतलचर १०० हेक्टर क्षेत्रावर २० टीएमसी पाणीसाठा होईल. तालुक्यातील गावागावात नदी नाले खोलीकरणाची कामे झाली आहेत. एकंदर १४१ किलोमीटरची कामे पूर्ण झाली आहेत. यात २१ लाख १५ हजार घनमीटर म्हणजेच २११५ टी.एम. सी. पाणी साचणार आहे.
सिमेंट नाला बंधाऱ्यांचे पुनरूज्जीवन, खोलीकरण, गाळ काढणे आदी कामांमुळे पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. सध्या तालुक्यातील खर्डा, नान्नज, जामखेड या मंडळ परिसरात चांगला पाऊस झाला आहे. पावसावर अवलंबून असलेल्या जामखेड तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. पाऊस चांगला होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. अनेक विहिरींना, बोअर, व तलावात पाणी आले आहे.
(प्रतिनिधी)
पावसाची धमाल; ‘जलयुक्त’ची कमाल
अहमदनगर : दुष्काळी नगर तालुक्यात जलयुक्त अभियानात झालेल्या बांध बंदिस्ती, खोल समतलचर, सिमेंट नाला बांध या कामामुळे वर्षानुवर्षे पाणी टंचाईची साडेसाती आता हटण्यास सुरुवात झाली आहे. खरीप पिकांना यामुळे जीवदान तर मिळालेच पण पाणी साठ्यात वाढ होत असल्याने तालुक्यात आता ‘जलयुक्त’ ची कमाल दिसू लागली आहे. मात्र गावातील सर्व शिवार जलयुक्त होण्यासाठी अजून जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
सतत दुष्काळी आणि पर्जन्यमान कमी असणारा नगर तालुका गेली अनेक वर्ष दुष्काळाच्या झळा सोसत आहे. यावर्षी नगर तालुक्याने मानगुटीवर बसलेला दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी जलयुक्त अभियानात सहभाग घेतला. शासनाने नगर तालुक्यातील १८ गावांची यासाठी निवड केली. यातून गावांमध्ये बांध बंदिस्ती, खोल समतलचर, सिमेंट नाला, बांध यांची कामे झाली. मात्र ७ गावांनी लोकसहभाग व लोकवर्गणी करून गावातील जुन्या नदी व ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण केले. यात गुंडेगाव या गावाने सर्वात प्रथम यात लोकसहभागातून १६ बंधाऱ्याचे खोलीकरण केले. यासाठी ५५ लाख खर्च केले, परंतु एक जोरदार पाऊस सारे गाव जलमय होऊन पाणी टंचाई नष्ट करण्यास पुरेसा ठरतो. सारोळा कासार गावाने ४५ लाख वर्गणीतून जवळपास ९ कि.मी. नदीचे खोलीकरण केले. मंगळवारी झालेल्या पहिल्या पावसामुळे यात बऱ्यापैकी पाणी साचले. अशाच पध्दतीचे काम अकोळनेर, मजले चिंचोली, धनगरवाडी, इमामपूर, बहिरवाडी, पांगरमल या गावांमध्ये झाल्याने थोड्या पावसात पाणीसाठा वाढून वाहून जाणारे पाणी शेत आणि नदीत साचल्याने पाणी मोठ्या प्रमाणात मुरण्यास मदत झाली. विहिरीची पाणी पातळीही वाढत आहे.
या पाण्यामुळे खरीप पिकांना चांगला आधार मिळाला.तरीही अजून जोरदार पाऊस झाल्यास जलयुक्तच्या कामामुळे तालुक्यातील १२ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. चिचोंडी पाटील, बारदरी या गावातही जलयुक्तच्या कामांनी कमाल केल्याने पाणी पातळी व पाणी साठा वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)
साठलं अडीच टीसीएम पाणी
अकोले : जलयुक्त शिवार अभितानांर्तगत तालुक्यातील १९ गावात सन २०१५-१६ ला १९ गावात ८४० पैकी ८०० कामे पूर्ण झाली यात कृषी विभागाच्या कामातून २ हजार ३५३ टीसीएम पाणी साठा झाला आहे. तर सन २०१६-१७ मध्ये १७ गावात १७७ मंजूर कामांपैकी ५६ कामे पूर्ण झाले असून यासाठी ८८ लाख ३२ हजार रुपये खर्च झाले आहे. यासर्व कामांमुळे गाव शिवार जलयुक्त झाले आहेत़
सन २०१६-१७ मधे जलयुक्त शिवार योजनेतील १७७ पैकी केवळ ५६ कामे पूर्ण झाले असून लोकसहभागातून १६ कामे झाली यात पाणी साठले आहे. यावर्षी कृषीची १५४ कामे मंजूर असून पैकी ३८ कामे पूर्ण झाले आहे. तसेच वन विभागाचे २२ पैकी १९ तर लघु पाटबंधारेचे एकमेव काम मंजूर होते ते अपूर्ण आहे. सामाजिक वनीकरण, पंचायत समिती, लघु सिंचन कडे एकही काम नाही. सन २०१५-१६ ला जलयुक्तचे ८४० कामे मंजूर होती पैकी ८०० कामे पूर्ण झाले आहे. तर लोकसहभागातून ८ कामे पूर्ण झाली आहेत.
जलयुक्त मधून रामायणाची साक्ष असलेल्या आजोबा गडाच्या पायथ्याला मुळा धरणाच्या उगमस्थानी असलेल्या कुमशेत या दुर्गम आदिवासी खेड्यात जलयुक्त शिवार योजनेतून चांगले काम झाले असून आदिवासींची शेती आठमाही बागायती झाली आहे. लघु पाटबंधारे विभागातून ११ कामे झाली असून एका पाझर तलावातील मातीही काढण्यात आली आहे. लघु पाटबंधारेच्या कामात जलयुक्तमधून जवळपास ३५ दशलक्ष घनफुट पाणी साठा झाला आहे.
(तालुका प्रतिनिधी)
‘जलशिवार’ला पावसाची प्रतीक्षा
शिर्डी : तालुक्यात डॉ़ सुजय विखे यांनी लोकसहभागातून राबवलेले जल क्रांती अभियान व शासनाच्या माध्यमातून झालेली जलयुक्त शिवारची कामे मोठ्या प्रमाणात झाली असली तरी या तालुक्यात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने या योजनांना पावसाची प्रतीक्षा आहे़
सध्या गोदावरी कालव्याला पाणी असल्याने शक्य असेल तेथील गाळ काढलेले, खोलीकरण करण्यात आलेले बंधारे, तळी, शेततळी भरून घेण्यात येत आहेत़ मात्र तालुक्यात केवळ सरासरी ४७ टक्के पाऊस झाल्याने कालव्यांशी संलग्न नसलेल्या योजना कोरड्या आहेत़ विशेष म्हणजे यंदा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ़ सुजय विखे यांनी तालुक्यात खालावलेली भूजल पातळी वाढण्यासाठी लोकसहभागातून जलक्रांती अभियान राबवले़ यात नागरिकांनी तलाव खोलीकरण, बंधाऱ्यातील गाळ काढणे, ओढे खोलीकरण आदींसाठी जेवढा निधी जमवला तेवढाच निधी डॉ़ सुजय विखे यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनानुसार जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यात टाकला़ यामुळे जलसंधारणाची मोठी कामे झाली़ नागरिकांच्या एकजुटीने व डॉ़ सुजय विखेंच्या पुढाकाराने अनेक ठिकाणची अतिक्रमणेही निघाली़ शिर्डी, पुणतांबे, राहाता आदी गावांत मोठ्या प्रमाणावर कामे झाली़ यातील काही योजना आता कालव्यांच्या पाण्याने भरण्यात येत आहेत़ तथापी अन्य कामांना पावसाची प्रतीक्षा आहे़ (प्रतिनधी)
श्रीगोंदा तालुक्यातील ७० टक्के क्षेत्र सिंचनाखाली
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील ७० टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. श्रीगोंदा शहरातील सरस्वती नदीवर लोकवर्गणीतून जलसंधारण अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. आठ लाख खर्चून पाच कि.मी. अंतराच्या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले.
श्रीगोंदा तालुक्यात सुमारे दोन कोटींची कामे लोकसहभागातून झाली. या लोकसहभागातून अनेक गावांमध्ये जलशिवार अभियान राबविण्यात आले. मढेवडगाव येथे प्रा. फुलसिंग मांडे यांच्या संकल्पनेतून मढेवडगाव येथील ओढ्यावर जलशिवार अभियान राबविण्यात आले. लोणीव्यंकनाथ येथील ओढ्यावर बाळासाहेब नाहाटा यांनी खटकी बंधारे बांधले. खामकरवाडीत तरूणांनी ओढ्यावर बंधारा बांधला.
आमदार राहुल जगताप यांनी कुकडी जलशिवार अभियानासाठी दोन पोकलॅन मशिन खरेदी करून तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलशिवार अभियानाची कामे हाती घेतली. नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी बंधाऱ्यासाठी एक लाख रुपयांची वर्गणी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे म्हातारपिंप्री, हिरडगाव, वांगदरी, मांडवगण, रूईछत्तीशी येथे मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यासाठी आर्थिक बळ मिळाले
पारगाव सुद्रिक येथील शेतकऱ्यांनी पारगाव- श्रीगोंदा रोडलगत मोठा पाझर तलाव तयार केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडवगण येथे जलशिवार अभियान राबविण्यासाठी योगदान दिले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Water in Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.