देशात १ कोटी ६८ लाख कापूस गाठींची आवक!
By admin | Published: February 3, 2017 07:33 PM2017-02-03T19:33:51+5:302017-02-03T19:33:51+5:30
सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर ; कापसाचा वेचणी हंगाम अंतिम टप्प्यात!
अकोला, दि. ३- कापूस वेचणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, यावर्षी कापसाचे दरही समाधानकारक असल्याने बाजारात कापसाची आवक १ कोटी ६८ लाख गाठी एवढी वाढली आहे. दरम्यान, कापसाचे दर वाढण्याची शक्यता कापूस उद्योजकांनीच वर्तविली आहे.
यावर्षी राज्यात ३२ लाख हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे; पण कापूस पट्टा असलेल्या पश्चिम विदर्भात यवतमाळ जिल्हा वगळता कापूस पेरणी घटली आहे. पाऊस मात्र समाधानकारक झाल्याचे कापसाच्या उत्पादनात वाढ झाली असून, एकरी सरासरी आठ ते दहा क्विंटलपर्यंत कापसाचा उतारा लागला आहे. तसेच दरही प्रतिक्विंटल ५,८00 ते ६ हजार रुपयापर्यंत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. एरवी कापसाला पूरक दर मिळत नसल्याने दर वाढतील या प्रतीक्षेत शेतकरी कापूस साठवून ठेवत होता; पण यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कापसाची बाजारात चांगली आवक आहे.
कापसाची होणारी निर्यात, देशांतर्गत वाढलेली कापसाची मागणी तसेच सरकीचे दर वाढल्याने कापसाच्या दरात तेजी आली आहे. मागील दहा वर्षात यावर्षी वाढलेले कापसाचे दर हे सर्वाधिक आहेत. पावसाची अनिश्चितता आणि उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळणारे दर बघता या खरीप हंगामात पश्चिम विदर्भातील शेतकर्यांनी कपाशीची पेरणी कमी करू न सोयाबीन पेरणी केली; परंतु मध्ये पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनला ताण पडला. त्याचा परिणाम अल्प प्रमाणात उत्पादनावर झाला. असे असले तरी सोयाबीनचे उत्पादन बर्यापैकी झाले; परंतु हमी दरापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकर्यांची प्रचंड लूट झाली; परंतु कापसाने यावर्षी शेतकर्यांना तारले आहे.
- कापसाचे दर सध्या ६ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले असून, या दरात आणखी वृद्धी होण्याची शक्यता आहे. सध्या आवक वाढली असली तरी दर वाढणार असल्याने शेतकर्यांनी कापूस विकण्याचे टाळले आहे.
बसंत बाछुका
कापूस उद्योजक,
अकोला.