१ लाख २००८ ‘क्यूआर काेड’ लावले, सर्वेक्षणामुळे काम थांबले !
By नितिन गव्हाळे | Published: January 30, 2024 09:06 PM2024-01-30T21:06:15+5:302024-01-30T21:06:23+5:30
कुठे लावले, कुठे सोडल्याने, नागरिकांमध्ये संभ्रम
नितीन गव्हाळे
अकोला : शहरात घरोघरी निघणारा ओला व सुका कचरा संकलित करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी क्यूआर कोड लावण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील घरोघरी क्यूआर कोड लावण्याचे काम सुरू आहेत. आतापर्यंत महापालिका प्रशासनाने १ लाख २००८ क्यूआर कोड लावले आहेत. परंतु मराठा आरक्षणासाठीच्या सर्वेक्षणात कर्मचारी, अधिकारी गुंतल्यामुळे क्यूआर कोडचे काम रखडले आहे. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये कुठे क्यूआर कोड लावले तर कुठे सोडल्याने, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
ओला व सुका घनकचरा ‘डोअर टू डोअर’ संकलित करण्याच्या दृष्टिकोनातून घरांना ‘क्यूआर काेड’ लावण्यात येत आहेत. गत काही वर्षांपासून शहरात घंटागाडीच्या माध्यमातून घराघरांमधील कचरा संकलित करण्यात येतो. परंतु नागरिक सुका व ओला कचरा वेगवेगळा न करता, एकसोबतच कचरा घंटागाडीत टाकतात. त्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण करावे आणि स्वच्छ शहर व्हावे. त्यासाठी केंद्र शासनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून शहरात घरोघरी क्यूआर कोड लावण्याचे काम सुरू आहेत. या कामासाठी महापालिकेचा आराेग्य व स्वच्छता विभाग कामाला लागला आहे.
सर्वच घरांना क्यूआर कोडचे उद्दिष्ट
महापालिका प्रशासनाने अकोला शहरातील सर्वच घरांना क्यूआर कोड लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहरातील कोणतेही घर यातून सुटणार नाही. हा उपक्रम केंद्र शासनाचा असला तरी, याचा फायदा महापालिका प्रशासनाला होणार आहे. सर्व डाटा महापालिकेकडे जमा होणार असल्याची माहिती महापालिका स्वच्छता विभागाचे प्रमुख प्रशांत राजूरकर यांनी दिली.