आणखी ११ हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे १०.३२ कोटी!
By संतोष येलकर | Published: May 28, 2023 05:33 PM2023-05-28T17:33:19+5:302023-05-28T17:35:13+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविला विभागीय आयुक्तांकडे अहवाल.
अकोला : गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यापैकी ९ एप्रिलपर्यंतच्या पीक नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर गेल्या २६ व २७ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात जिल्ह्यातील पीक नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी, दि. २६ मे रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.
त्यानुसार ५ हजार ८८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील आणखी ११ हजार १८६ शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत देण्यासाठी १० कोटी २६ लाख ३२ हजार ८८५ रुपये मदतनिधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. गेल्या २६ ते २७ एप्रिल रोजी जिल्ह्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, कृषी विभागामार्फत प्राप्त अहवालाच्या आधारे जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात जिल्ह्यातील ११ हजार १८६ शेतकऱ्यांचे ५ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १० कोटी २६ लाख ३२ हजार ८८५ रुपये अपेक्षित मदतनिधी मागणीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २६ मे रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
गेल्या २६ व २७ एप्रिल रोजी असे झाले होते पिकांचे नुकसान!
गेल्या २६ व २७ एप्रिल रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात जिल्ह्यात ११ हजार १८६ शेतकऱ्यांचे ५ हजार ८८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
त्यामध्ये बागायत पिकांचे ५ हजार ४१६ हेक्टर आणि १ हजार १८३ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले होते. या पीक नुकसानीची शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १० कोटी २६ लाख ३२ हजार ८८५ रुपये मदतनिधीची मागणी करण्यात आली आहे.