‘स्क्रब टायफस’चे १० ‘कन्फर्म’, २३ संशयित रुग्ण!
By atul.jaiswal | Published: September 8, 2018 01:12 PM2018-09-08T13:12:33+5:302018-09-08T13:17:09+5:30
चार जिल्ह्यांमध्ये ६ सप्टेंबरपर्यंत १० ‘कन्फर्म’, तर २३ संशयित रुग्णांची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे.
अकोला : डेंग्यू व इतर आजारानंतर आता ‘स्क्रब टायफस’ या कीटकजन्य आजाराचा संसर्ग वाढत असून, आरोग्य सेवेच्या अकोला मंडळातील अकोला, अमरावती, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या चार जिल्ह्यांमध्ये ६ सप्टेंबरपर्यंत १० ‘कन्फर्म’, तर २३ संशयित रुग्णांची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे. विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यात मात्र ‘स्क्रब टायफस’चा एकही रुग्ण नसल्याची नोंद आहे.
‘चिगर माईटस्’ या कीटकाच्या चावल्यामुळे होणाऱ्या ‘स्क्रब टायफस’चे रुग्ण पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळून येत असून, नागपूर, गडचिरोली, भंडारा व मध्य प्रदेशातील १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम विदर्भातही या आजाराने डोके वर काढले आहे. ‘स्क्रब टायफस’ची व्याप्ती वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाकडून कसोशीने प्रयत्न केले जात असतानाही आतापर्यंत अकोला, अमरावती, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये या आजाराचे १० ‘कन्फर्म’, तर २३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव रुई येथील एका महिलेचा मृत्यू स्क्रब टायफससदृश आजाराने झाल्याची नोंद आहे.
‘ती’ महिला मध्य प्रदेशची
‘स्क्रब टायफस’वर उपचार घेत असताना नागपूर ‘जीएमसी’मध्ये मृत्यू झालेली एक महिला अकोला जिल्ह्यातील असल्याची नोंद होती. शोध घेतला असता, ती महिला अकोल्यातील नव्हे, तर मध्य प्रदेशातील असल्याचे समोर आले.
महिलांची संख्या अधिक
‘स्क्रब टायफस’ची लागण झालेल्या कन्फर्म व संशयित अशा एकूण ३३ रुग्णांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. यामध्ये २० महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे.
‘स्क्रब टायफस’चे संशयित रुग्ण आढळून येत असले, तरी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्नरत आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
- डॉ. अभिनव भूते, सहायक संचालक, आरोग्य सेवा (हि.) अकोला.
जिल्हा कन्फर्म संशयित
अमरावती ०८ ०४
अकोला ०१ ०६
बुलडाणा ०१ ००
यवतमाळ ०० १३
वाशिम ०० ००
--------------------------------------------------
एकूण १० २३