नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या पाच व्यक्तींच्या वारसांना १० लाखांची मदत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 02:26 PM2019-12-10T14:26:43+5:302019-12-10T14:26:50+5:30
मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना २ लाख रुपये तसेच जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत प्रधानमंत्री राष्ट्रीय साहाय्यता निधीतून जाहीर करण्यात आली आहे.
अकोला : जिल्ह्यात यावर्षी पुरात वाहून गेल्याने व वीज पडून नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील पाच व्यक्तींच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय साहाय्यता निधीतून १० लाख रुपयांची मदत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे. उपलब्ध मदतीची रक्कम तहसीलदारांमार्फत संबंधितांना वितरित करण्यात येणार आहे.
राज्यात २०१९ मध्ये पूर, चक्रीवादळ आणि वीज पडून इत्यादी नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना २ लाख रुपये तसेच जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत प्रधानमंत्री राष्ट्रीय साहाय्यता निधीतून जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात यावर्षी नैसगिक आपत्तीने मृत्यू झालेल्या बाळू नारायण उमाळे, कपिल दीपक शेगोकार, महेंद्र रामकृष्ण वानखडे, प्रशांत बाळकृष्ण गवारगुरू व अभिजित श्रीकृष्ण इंगळे इत्यादी पाच व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयेप्रमाणे १० लाख रुपयांची मदत प्रधानमंत्री राष्ट्रीय साहाय्यता निधीतून मंजूर करण्यात आली आहे. १० लाख रुपये मदतीची रक्कम ९ डिसेंबर रोजी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम १० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसील कार्यालयांना वितरित करण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयेप्रमाणे मदतीच्या रकमेचे धनादेश तहसीलदारांमार्फत देण्यात येणार आहेत.