राष्ट्रीय महामार्गावर दुहेरी अपघातात १० जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 05:48 PM2018-10-14T17:48:30+5:302018-10-14T17:49:26+5:30
कुरूम (अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर झालेल्या दुहेरी अपघातात १० जण गंभीर जखमी झाल्याची घटना १४ आॅक्टोबर रोजी घडली.
कुरूम (अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर झालेल्या दुहेरी अपघातात १० जण गंभीर जखमी झाल्याची घटना १४ आॅक्टोबर रोजी घडली. प्रवासी घेऊन येत असलेल्या आॅटोला मधापुरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने सहा जण गंभीर जखमी झाले, तर हयातपूरजवळ टायर फुटल्याने भरधाव कार उटल्याने चार जण जखमी झाले.
बडनेरा येथून प्रवासी घेऊन कुरूमला येत असलेल्या आॅटो क्र. एमएच २७ बीडब्ल्यू ०९११ ला मधापुरी फाट्यानजीक रमना शिवारात अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या धडकेमुळे आॅटो उलटून सहा जण गंभीर जखमी झाले. यामध्ये सुरेश माणिकराव कुरळकर (४५) अनिता सुरेश कुरळकर (३५), आकाश सुरेश कुरळकर (१५) रा. पिंपळखुटा ह. मु. पंचवटी अमरावती, अ.वसीम अ.मन्नान (२६), पूजा रंगराव गेबड (२०), आॅटोचालक सलीमखा बुरानखा (३५) सर्व रा. कुरूम यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच कुरूम चौकीचे हे.काँ. बाळकृष्ण नलावडे, पो.काँ. रामेश्वर कथलकर यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना गावकऱ्यांच्या मदतीने स्थानिक प्रा.आ. केंद्रात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून सहाही जखमींना प्रा.आ. केंद्र कुरूमच्या रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचाराकरिता अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरा अपघात हयातपूरनजीक घडला. अकोलावरून अमरावतीकडे जाणारी कार क्र. एमएच ३० एटी १०१६ चे टायर फुटल्याने चार जण जखमी झाले. कारमधील जखमी हे अकोल्यातील रहिवासी असल्याचे समजते. त्यांची नावे कळू शकले नाहीत.
महामार्ग बनला मृत्यूचा सापळा!
राष्ट्रीय महामार्ग क्र. सहाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातात वाढ झाली आहे. खड्ड्यांमुळे दुचाकींसह चारचाकी वाहनांचा अपघात होत असून, अनेकांना आपले प्राण गमावले आहेत, तर काही गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची तसेच खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.