अकोल्यातील १० जणांचा दिल्लीच्या संमेलनात सहभाग; चार जण विलगीकरण कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 06:13 PM2020-04-01T18:13:57+5:302020-04-01T18:16:11+5:30
दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमाला अकोल्यातील १० जण ७ मार्च रोजी दिल्ली येथे गेले होते.
अकोला : अकोला जिल्ह्यातील १० जण दिल्ली येथे पार पडलेल्या संमेलनात सहभागी झाले होते. कोरोना संशयित म्हणून या सर्वांचा जिल्हा प्रशासनाने शोध घेतला असून, यापैकी केवळ चार जण अकोल्यात परतले असून, त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमाला अकोल्यातील १० जण ७ मार्च रोजी दिल्ली येथे गेले होते. ११ मार्च रोजी परत आले होते. या दहापैकी अकोला तालुक्यातील ४, बार्शीटाकळी ३, पातूर ३ येथील रहिवासी आहेत. यापैकी चौघांसोबत संपर्क झाला आहे. उर्वरित ६ अकोल्यात परतले नाहीत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. संपर्क झालेल्या व्यक्तींना तपासणीसाठी सर्वोपचारच्या ‘आयसोलेशन’ कक्षामध्ये दाखल केले असून, बुधवारी यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
दिल्ली येथे गेलेल्या १८ लोकांनाही दाखल केले!
दिल्ली येथील याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिल्लीत गेलेल्या; मात्र २ मार्च रोजीच परत आलेल्या १८ लोकांना मंगळवारी रात्री सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांची तपासणी करून त्यांचे स्वॅब नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत.