‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींच्या चाचण्यांमध्ये १० टक्के पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 11:38 AM2020-12-06T11:38:39+5:302020-12-06T11:41:03+5:30
Akola CoronaVirus News संकलित नमुन्यांमध्ये जवळपास १० टक्के अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अकोला: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात आहे. अशा सुपर स्प्रेडरच्या आतापर्यंत संकलित नमुन्यांमध्ये जवळपास १० टक्के अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे इतरांच्या संपर्कात येताना नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागतर्फे करण्यात येत आहे. राज्यभरात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्यभरात विशेष खबरदारी घेत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात अनेकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या म्हणजेच ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींची कोविड चाचणी केली जात आहे. जिल्ह्यातील विविध भागात मागील तीन दिवसात ३०० पेक्षा जास्त व्यक्तींचे नमुने संकलित करण्यात आले असून, त्यापैकी २२० अहवाल प्राप्त झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. प्राप्त अहवालामध्ये १० टक्के म्हणजेच जवळपास २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत; मात्र असे असूनही अनेक जण चाचणीसाठी नमुने देण्यास टाळत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा प्रकार कोरोनाच्या फैलावासाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
फैलाव वाढण्याची शक्यता
कोरोनाचे संकट कायम असूनही अनेक जण कोरोनाकडे दुर्लक्ष करत बेफिकिरीने वावरताना दिसून येत आहेत. गर्दीच्या ठिकाणीही मास्कचा वापर टाळत आहेत. यामध्ये अनेक लोकांच्या संपर्कात येणाऱ्यांचे व्यक्तींचाही समावेश असून, इतर लोक त्यांच्या थेट संपर्कात येत आहेत. अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींचेही अहवाल पॉझिटिव्ह येऊ लागल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता वाढली आहे.
कोरोनाला रोखणे प्रत्येकाची जबाबदारी
नागरिकांची बेफिकिरी ही कोरोनाच्या फैलावाला कारणीभूत ठरत आहेत. काेरोनाचा हा फैलाव राेखण्यासाठी सर्वसामान्यांनी आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पोलिसांचेही सहकार्य
सुपर स्प्रेडर व्यक्तींकडून चाचणीसाठी नमुने देण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला पोलिसांचे सहकार्य घ्यावे लागत असून, त्यांच्या मदतीने सुपर स्प्रेडर व्यक्तींचे नमुने संकलित केले जात असल्याचीही माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
थेट लोकांपर्यंत जाऊन चाचणीसाठी नमुने संकलित केले जात आहे; मात्र अनेक जण चाचणीबाबत उदासीन दिसून येत आहे. कोरोनाविरुद्धची ही लढाई प्रत्येक नागरिकाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने चाचणीसाठी पुढे यावे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरक्ष्ीत अंतर, मास्कचा वापर आणि नियमित हात धुणे या नियमांचे पालन करावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला