नराधमास १0 वर्षांचा सश्रम कारावास
By Admin | Published: October 7, 2015 02:09 AM2015-10-07T02:09:05+5:302015-10-07T02:09:05+5:30
खदान परिसरातील चार वर्षाच्या मुलीसोबत केले होते अनैसर्गिक कृत्य.
अकोला: खदान परिसरातील महात्मा फुले नगरमध्ये एका चार वर्षीय मुलीसोबत अनैसर्गिक कृत्य करणार्या नराधम आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी १0 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सुमेध भीमराव शिरसाट असे आरोपीचे नाव आहे. महात्मा फुले नगरमधील चार वर्षीय मुलगी ३ डिसेंबर २0१३ रोजी सायंकाळी अंगणामध्ये खेळत असताना शेजारी सुमेध भीमराव शिरसाट याने दारूच्या नशेत चिमुकलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घरात नेले. त्याने चिमुकलीसोबत अनैसर्गिक कृत्य केले. चिमुकली घराबाहेर पडताच आईकडे रडत गेल्याने, आईने तिची विचारपूस केली. चिमुकली काहीही न बोलता रडतच असल्याने तिच्या आईने शरीराची पाहणी केली. त्यानंतर ती मुलीला घेऊन थेट खदान पोलीस ठाण्यात दाखल झाली. खदान पोलिसांनी मुलीची तातडीने वैद्यकीय तपासणी केली असता, मुलीसोबत अनैसर्गिक कृत्य झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी तिच्या नातेवाइकांनी खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुमेध भीमराव शिरसाट याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ (२), ३७७, ३६३ व पॉस्को कायद्याच्या कलम ५ आणि ६ नुसार गुन्हा दाखल करून, आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयामध्ये झाली. चिमुकलीने सांगितेली आपबिती आणि आठ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीविरूद्ध दोष सिद्ध झाला. न्यायालयाने भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ (२), ३७७, व पॉस्को कायद्याच्या कलम ५ आणि ६ मध्ये सुमेध शिरसाट यास १0 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून, २ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच कलम ३६३ मध्ये दोन वर्षांची शिक्षा व ५00 रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.