नवीन प्रभागांसाठी १०० कोटी; २० कोटीतून होतील विकास कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 02:30 PM2018-05-10T14:30:05+5:302018-05-10T14:30:05+5:30

प्रशासनाने विकास कामांचे प्रस्ताव तयार करून तातडीने निविदा प्रकाशित करण्याचा निर्णय बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला दिले.

100 crores for new wards; Development works will be done by 20 crores | नवीन प्रभागांसाठी १०० कोटी; २० कोटीतून होतील विकास कामे

नवीन प्रभागांसाठी १०० कोटी; २० कोटीतून होतील विकास कामे

Next
ठळक मुद्दे २० कोटींतून नवीन प्रभागातील कामे तातडीने निकाली काढण्याचा विषय सर्वसाधारण सभेत पटलावर आला.नवीन प्रभागातील नागरिकांना भेडसावणाºया समस्यांवर प्रकाशझोत टाकला. महापौर विजय अग्रवाल यांनी २० कोटींच्या निधीत मनपाचा वीस टक्के आर्थिक हिस्सा जमा करण्याचे सूचित करीत प्रशासनाला निविदा प्रकाशित करण्याचे निर्देश दिले.


अकोला: महापालिका क्षेत्राची हद्दवाढ झाल्यानंतर शहरात समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागातील विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी मनपा प्रशासनाने सादर केलेल्या ३१० कोटींच्या विकास आराखड्यापैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला. यामधून २० कोटींचा निधी मनपाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने विकास कामांचे प्रस्ताव तयार करून तातडीने निविदा प्रकाशित करण्याचा निर्णय बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला दिले.
शहराचे अपुरे भौगोलिक क्षेत्रफळ व शहरालगतच्या गावांचा महापालिकेद्वारे उपलब्ध केल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांवर ताण पडत असल्यामुळे मनपा क्षेत्राच्या हद्दवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. प्रशासनाने १३ ग्राम पंचायती अंतर्गत येणाºया २४ गावांचा मनपात समावेश केला. हद्दवाढ झालेल्या भागातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने ३१० कोटींचा विकास आराखडा तयार करून सात महिन्यांपूर्वी शासनाकडे सादर केला होता. याविषयी आ.रणधीर सावरकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देत २० कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश नगर विकास विभागाला दिले होते. मनपाला प्राप्त २० कोटींतून नवीन प्रभागातील कामे तातडीने निकाली काढण्याचा विषय सर्वसाधारण सभेत पटलावर आला असता, भाजपाचे नगरसेवक सुनील क्षीरसागर, तुषार भिरड, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, सतीश ढगे, सुमनताई गावंडे यांनी नवीन प्रभागातील नागरिकांना भेडसावणाºया समस्यांवर प्रकाशझोत टाकला. त्यावर महापौर विजय अग्रवाल यांनी २० कोटींच्या निधीत मनपाचा वीस टक्के आर्थिक हिस्सा जमा करण्याचे सूचित करीत प्रशासनाला निविदा प्रकाशित करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे आगामी दिवसात नवीन प्रभागातील रखडलेल्या विकासाची गाडी रूळावर येणार असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
 



श्रेय घेण्यासाठी चढाओढ
भाजपाचे नगरसेवक सुनील क्षिरसागर, तुषार भिरड यांनी नवीन प्रभागासाठी तयार केलेल्या विकास आराखड्याचा शासनदरबारी आ.रणधीर सावरकर यांनी पाठपुरावा केल्याचे सांगत खा.संजय धोत्रे, आ.गोवर्धन शर्मा यांचे आभार व्यक्त केले. त्यावर शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी हद्दवाढ झाल्यानंतर संबंधित भागाच्या विकासासाठी निधी देणे शासनाला बंधनकारकच असल्याचे ठासून सांगत शिवसेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी शासनाकडे प्रयत्न केल्याचे नमूद केले. तर सेनेचे नगरसेवक शशिकांत चोपडे यांनी पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्यामुळे १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर झाल्याचे सांगत पालकमंत्र्यांचे आभार मानले.

विकासाला चालना देणारे प्रस्ताव मंजूर
* आठ कोटीतून मुख्य १७ मार्गावरील वीज वाहिन्या होणार भूमिगत
* नवीन प्रभागातील विकास कामांसाठी २० कोटींची निविदा
* शिवणी येथील तलावातील मच्छीमारीवर मनपाची राहणार देखरेख
* मनपा क्षेत्रात होणार १८ हजार वृक्ष लागवड
* ‘डीपी प्लान’मधून कॅनॉल (पाण्याचे क्षेत्र)वगळून रस्त्याची तरतूद
* मनपा शाळेतील बालवाडी बंद करून अंगणवाडी सुरू होणार
* मनपा कर्मचाºयांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू
* मानधनावरील कर्मचाºयांना मुदतवाढ

 

Web Title: 100 crores for new wards; Development works will be done by 20 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.