रस्त्यांसाठी शंभर कोटी!
By admin | Published: October 8, 2016 03:18 AM2016-10-08T03:18:51+5:302016-10-08T03:18:51+5:30
अकोलेकरांना मिळाली विकास योजनेची भेट; मुख्यमंत्र्यांची ग्वाही.
अकोला, दि. 0७- अकोल्याचे पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी गेल्या दोन वर्षात माझ्या मागे लागुन अनेक विकास योजनांसाठी निधी खेचून आणला, काही योजनांचा ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यामध्ये शहरातील रस्ते हा महत्वाचा प्रश्न आहे. या रस्तांसाठी विकास आराखडा तयार करण्यात यावा. मी शंभर कोटीचा निधी मंजूर करतो अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन आणि सजिर्कल शल्यक्रियागृहाचे (ओ.टी.) लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात मंचावर अध्यक्षस्थानी जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील हे होते तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचेसह खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार बळीराम सिरस्कार, आमदार हरिष पिंपळे,आमदार रणधीर सावरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे, महापौर उज्वला देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, अकोला हे वैद्यकीयक्षेत्रामध्ये वेगळी उंची असणारे शहर आहे. या शहराच्या विकासासाठी शासनाने निधी कमी पडू दिला नाही. येणार्या काळात या शहरातील रस्ते चकचकीत व्हावे यासाठी रस्ते विकासासाठी विकास आराखडा तयार करा. मते मिळतात म्हणून कोणतीही गल्ली घेऊ नका, मी पण मनपामध्ये होतो त्यामुळे आराखडा तयार करतांना सर्व अप्रोच रोड तसेच मुख्य रस्त्यांचाही समावेश करा, मी शंभर कोटीचा निधी देतो असे मुख्यमंत्र्यांनी जाहिर करून आणखी एक विकास योजनेची भेट दिली. यावेळी मंचावर वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.राजेश कार्यकर्ते, विभागीय आयुक्त जे. पी गुप्ता, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जि.प. सीईओ अरूण विधळे, विशेष पोलीस महानिरिक्षक विठ्ठल जाधव, जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना, तेजराव थोरात पाटील, किशोर मांगटे पाटील विजय अग्रवाल उपस्थित होते.
'काही गोष्टी जाहीर बोलायच्या नसतात'
अकोल्यामध्ये भाजपा नेतृत्वाची मांदियाळी जमली की एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी राजकीय टोलबाजी होत असते. भाजपामधील पक्षांतर्गत संघर्षामुळे राजकीय चिमटे घेऊन मतभेदाचे अनेकदा प्रदर्शन झालेले आहे. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात मात्र खासदार संजय धोत्रे यांनी विकास योजनांच्या दुखण्यावर नेमके बोट ठेवत मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले, खुप काही बोलायचे आहे, आपण सारेच जाणता पण सर्वांसमोर बोलणार नाही असे सांगुन मुख्यमंत्र्यांना भावनिक साद घातली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात खासदारांच्या ह्यसादह्ण ला प्रतिसाद देत संजुभाऊ पटलं ! काही गोष्टी जाहिर बोलायच्या नसतात असे सांगत राजकीय भाष्य टाळले मात्र केवळ या वाक्यानेही भाजपामधील राजकारणाची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली.
पीक नुकसानाच्या सर्व्हेचे आदेश !
अतवृष्टी किंवा परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास शासकीय निकषानुसार मदत दिली जाते. या परिसरातही शासनाने ठरविलेल्या निकषामध्ये पाऊस झाला असेल तर कुठलाही सर्व न करता मदत देण्याचे धोरण ठरविले आहे. मात्र अतवृष्टी, अवर्षणाच्या मदतीसाठी ठरविलेल्या निकषांपेक्षा कमी स्थिती असेल तर जिल्हाप्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
२४ समाविष्ट गावांना निधी !
महानगर पालीकेची हद्दवाढ झाल्याने २४ गावांचा समोवश अकोला शहरात झाला आहे. या सर्व गावांचा संतुलीत विकास व्हावा यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर केले. या निवेदनाची तत्काळ दखल घेत. या सर्व गावांच्या विकासासाठी निधी देण्यात येईल व कुठल्याही विभागावर विकासाबाबत अन्याय होणार नाही असे स्पष्ट केले.
अकोला-खंडवा रेल्वेमार्गासाठी बैठक
अकोला- खंडवा हा मिटरगेज रेल्वेमार्ग हा ६0 वर्ष जुना आहे. हा मार्ग ब्रॉडगेज करण्याची मागणी सातत्याने लावुन धरली आहे त्यामुळे केद्रीय पर्यावरण मंत्रालयासोबत बैठक धेऊन या प्रश्न सोडविण्याची मागणी खासदार संजय धोत्रे यांनी केली. याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री यांच्या सोबत बैठक घेणार असल्याची ग्वाही दिली.
भाऊसाहेब फुंडकरांची अनुपस्थिती खटकली !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात आल्यामुळे भाजपाचे सारे दिग्गज उपस्थित होते; मात्र पश्चिम वर्हाडातील एकमेव कॅबिनेट मंत्री तसेच कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर मात्र अनुपस्थित होते. त्यांची गैरहजेरी कार्यक्रम स्थळी चर्चेचा विषय होती. यासंदर्भात माहिती घेतली असता, ना.फुंडकर यांचे पत्रिकेत नाव नसल्यामुळे त्यांनी अकोल्यात हजेरी लावण्यापेक्षा वाशिमला उपस्थित राहणे पसंत केल्याचे समजले.