‘जीएमसी’च्या १00 विद्यार्थ्यांनी केला अवयव दानाचा संकल्प.
By admin | Published: September 5, 2016 02:44 AM2016-09-05T02:44:46+5:302016-09-05T02:44:46+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या १00 विद्यार्थ्यांनी अवयव दान करण्याचा संकल्प केला.
अकोला, दि. ४ : जिल्हय़ात ३0 ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या या महाअभियानात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या १00 विद्यार्थ्यांनी अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात राजेश कार्यकर्ते यांनी दिली.
अवयव दान हे जीवनदान आहे. शरीरातील अवयव दानातून मरणाच्या दाढेत असलेल्या रुग्णांना जीवनदान प्राप्त होऊ शकते; परंतु अवयव दानाविषयी समाजामध्ये जनजागृतीचा अभाव असल्याने, नागरिक अवयव दानासाठी पुढे येत नाहीत. या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आरोग्य शिक्षण व अनुसंधान संचालनालयाच्या पुढाकारामुळे राज्यातील सर्वच जिल्हय़ांमध्ये अवयव दान महाअभियान राबविण्यात आले. अकोला जिल्हय़ात वैद्यकीय महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग व विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ३0 ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान तीन दिवसीय अवयव दान महाअभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान विविध कार्यक्रम पार पडले. जिल्हय़ात अवयव दानासाठी एकूण दहा हजार नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गत तीन दिवसांत या अभियानास चांगला प्रतिसाद मिळाला असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल १00 विद्यार्थ्यांनी अवयव दानासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
दहा हजार नोंदणीचे उद्दिष्ट
अवयव दानासाठी समन्वय समितीने जिल्हय़ात दहा हजार नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी जिल्हय़ातील सातही तालुक्यांना प्रत्येकी १ हजार व अकोला शहर ३ हजार असे एकूण दहा हजार नोंदणी अर्ज वितरित करण्यात आले आहेत.