१५०० रुपये दराने खरेदी केलेल्या ज्वारीची २२ रुपये प्रतिक्विंटल दराने विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 11:49 AM2021-01-04T11:49:06+5:302021-01-04T11:56:27+5:30
१५०० रुपये दराने खरेदी केलेल्या ज्वारीची २२ रुपये प्रतिक्विंटल दराने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया १ जानेवारीपासून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने सुरु केली.
- संतोष येलकर
अकोला : आधारभूत किंमत योजनेंतर्गत चार वर्षांपूर्वी १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आलेल्या १० हजार ४४५ क्विंटल ज्वारीचा जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये भुसा झाला आहे. शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर, २२ रुपये प्रतिक्विंटल दराने भुसा झालेल्या ज्वारीची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया १ जानेवारीपासून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने सुरु केली.
शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने ज्वारी खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेल्या ज्वारीची जिल्हा पुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शिटाकळी, तेल्हारा इत्यादी ठिकाणी शासकीय धान्य गोदामांमध्ये साठवणूक करण्यात आली. गोदामांत साठवणूक करण्यात आलेल्या ज्वारीचा भुसा झाला. चार वर्षांच्या कालावधीनंतर गोदामांतील भुसा झालेल्या ज्वारीची २२ रुपये प्रतिक्विंटल दराने विल्हेवाट लावण्यास शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार १ डिसेंबर रोजी परवानगी देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील गोदामांतील भुसा झालेल्या ज्वारीची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया १ जानेवारीपासून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरु करण्यात आली. १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेल्या ज्वारीची २२ रुपये प्रतिक्विंटल दराने विल्हेवाट लावण्यात येत असल्याने, ज्वारी खरेदीतून शासनाला मिळणारा महसूल बुडाला आहे.
...तर ज्वारीला मिळाला असता प्रतिक्विंटल १०० रुपये भाव!
आधारभूत किंमत योजनेंतर्गत चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या १० हजार ४४५ क्विंटल ज्वारीचा भुसा झाल्यानंतर प्रतिक्विंटल २२ रुपये दराने ज्वारीची विल्हेवाट लावण्यात येत आहे. परंतु खरेदीनंतर सार्वजनिक व्यवस्थाअंतर्गत जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना ज्वारीचे वितरण करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली असती आणि प्रतिकिलो १ रुपया दराने ज्वारीचे शिधापत्रिकाधारकांना वितरण सुरु केले असते तर ज्वारीचा भुसा झाला नसता तसेच ज्वारीला प्रतिक्विंटल १०० रुपये भाव मिळाला असता.
कुंकू उत्पादन करणाऱ्या तीन संस्थांकडून ज्वारीची उचल!
जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांतील भुसा झालेल्या ज्वारीची २२ रुपये प्रतिक्विंटल दराने विल्हेवाट लावण्यात येत आहे. बुलडाणा, नांदुरा व अमरावती येथील कुंकू उत्पादन करणाऱ्या तीन संस्थांकडून २२ रुपये प्रतिक्विंटल दराने भुसा झालेल्या ज्वारीची १ जानेवारीपासून उचल सुरु करण्यात आली आहे.
आधारभूत किंमत योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात खरेदी केलेल्या १० हजार ४४५ क्विंटल ज्वारीची शासकीय धान्य गोदामांत साठवणूक करण्यात आली होती. या ज्वारीचा आता भुसा (अखाद्य) झाला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या १ डिसेंबर रोजीच्या आदेशानुसार २२ रुपये प्रतिक्विंटल दराने या ज्वारीची विल्हेवाट लावण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार ज्वारीची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
- बी. यु. काळे,जिल्हा पुरवठा अधिकारी.