इपिलेप्सी शिबिरात १०६ रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 02:21 PM2019-03-11T14:21:38+5:302019-03-11T14:21:51+5:30
अकोला : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आयोजित इपिलेप्सी शिबिरात १०६ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
अकोला : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आयोजित इपिलेप्सी शिबिरात १०६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी रुग्णांना तीन महिन्यांचे औषधही देण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, इपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्यातर्फे रविवारी शिबिर घेण्यात आले. त्यावेळी डॉ. सूर्या यांनी ० ते ४५ वर्षे वयोगटातील इपिलेप्सीच्या १०६ रुग्णांची तपासणी केली. शिबिरांतर्गत तज्ज्ञ न्यूरोफिजिशियनमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णांना तीन महिन्यांचे औषध देऊन त्यांना योग्य मार्गदर्शनदेखील केले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. आर. एस. फारुकी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. के. एस. घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
काय आहे इपिलेप्सी?
इपिलेप्सी हा मेंदूशी निगडित आजार आहे. यामध्ये रुग्णाला फिट येण्याचे प्रकार घडतात. इपिलेप्सी या आजाराला आकडी म्हणजेच फेफरे किंवा फिटदेखील म्हणतात.
तपासणी व समुपदेशन
हा आजार मेंदूशी निगडित असल्याने रुग्णांची ई.ई.जी. तपासणी करण्यात आली. त्यासोबतच रक्त तपासणीही करण्यात आली.
शिबिरांतर्गत इपिलेप्सी या आजारावर उपचारासाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवारी झालेल्या शिबिरात १०६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यांच्यावर औषधोपचारही करण्यात आला.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.