विवाहितांच्या छळाचे दीड वर्षात १0७ गुन्हे!
By Admin | Published: July 7, 2014 12:40 AM2014-07-07T00:40:00+5:302014-07-07T00:40:00+5:30
जिल्हय़ात विवाहिता, नवविवाहितांच्या छळाचे दरवर्षी सुमारे १५0 च्यावर गुन्हे दाखल होतात.
अकोला: जिल्हय़ात विवाहिता, नवविवाहितांच्या छळाचे दरवर्षी सुमारे १५0 च्यावर गुन्हे दाखल होतात. विवाहितेने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये पती, सासू, सासरे, दीर, नणंद आणि इतर नातेवाईकांची नावे दिली जातात आणि त्यानुसारच पोलिस या व्यक्तींना आरोपी बनवतात. बहुतांशवेळा कौटुंबिक कलहामध्ये पती, सासू, सासरे जबाबदार असतात; परंतु नणंद, तिचा पती व इतर नातेवाईकांचा काही दोष नसतानाही त्यांनाही आरोपी बनावे लागते. त्यामुळेच ४९८(अ) सारख्या गुन्हय़ामध्ये शिक्षेचे प्रमाणही अत्यल्प असल्याने या कलमाचा अनेकदा गैरवापर होतो, असे पोलिस अधिकारी, विधिज्ञांकडून बोलले जाते. हुंडाविरोधी कायद्याच्या गैरवापरावर तीव्र चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण चौकशी केल्याशिवाय सासरच्या मंडळींना अटक करू नये, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. यावरूनच महिलांकडून अनेक प्रकरणांमध्ये भादंवि कलम ४९८(अ)(पती व सासरच्या मंडळीकडून शारीरिक व मानसिक छळ) या कलमाचा गैरवापर केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. यानिमित्ताने जिल्हय़ातील विवाहिता, नवविवाहितांच्या छळ प्रकरणांचा आढावा घेतला असता, गंभीर प्रकार पुढे आले. जिल्हय़ात २0१३ या वर्षामध्ये ७१ आणि जानेवारी ते जून २0१४ या सहा महिन्यांच्या कालावधीत ३६ गुन्हे दाखल झाले. महिला तक्रार देताना पती, सासू, सासरे यांच्यासह घरात उपस्थित नसणारे दीर, नणंद, दिरानी, नणंदचा पती यांचीही नावे देते. त्यानुसार पोलिस या महिलेच्या कौटुंबिक कलहाशी संबंध नसलेल्या लोकांविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल करतात. या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. विधिज्ञांच्या मते, एकत्र कुटुंब नसल्याने छळ करणार तरी कोण? कुटुंबांमध्ये महिलेच्या छळाच्या घटना घडतात.