१०८ रुग्णवाहिकेने सहा वर्षात वाचवले ४६ लाख रुग्णांचे प्राण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:20 PM2020-02-12T12:20:33+5:302020-02-12T12:20:40+5:30
यामध्ये सर्वाधिक ९ लाख ५४ हजार २३ रुग्ण पुणे विभागातील आहेत.
अकोला : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका राज्यभरात अत्यावश्यक सेवा देत आहे. गत सहा वर्षात रुग्णवाहिकेने राज्यभरातील ४६ लाख ६६ हजार १८४ रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. यामध्ये सर्वाधिक ९ लाख ५४ हजार २३ रुग्ण पुणे विभागातील आहेत.
अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट आणि बेसिक लाइफ सर्पोट अशा दोन प्रकारच्या रुग्णवाहिका २०१४ पासून राज्यात रुग्णसेवा देत आहेत. महामार्गावरील अपघात असो, वा इतर घटनांमध्ये गंभीर झालेल्या रुग्णांना तातडीचा उपचार मिळावा, म्हणून १०८ क्रामांकाची रुग्णसेवा अत्यावश्यक सेवा देत आहे. गत सहा वर्षात अनेक अडचणींचा सामना करत रुग्णवाहिकेने गोल्डन अवर साधत लाखो रुग्णांचा जीव वाचविला. रुग्णसेवेसाठी राज्यभरात १०८ क्रमांकाच्या ९३७ रुग्णवाहिका रुग्णसेवा देत आहेत. यामध्ये २३३ अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट, तर ७०४ बेसिक लाइफ सपाोर्ट रुग्णावाहिकांचा समावेश आहे. यासाठी राज्यभरात ५ हजार डॉक्टर, चालक आणि व्यवस्थापक कार्यरत आहेत.
विभागनिहाय स्थिती
विभाग - रुग्ण संख्या
कोल्हापूर - ४,४९१८५
पुणे - ९,५४०२३
नाशिक - ६,४३७२८
नागपूर - ५,९५१८१
औरंगाबाद - ४, ३३८५३
लातूर - ४, ४२१७४
ठाणे - ६,२७३८७
अकोला जिल्ह्याची स्थिती (गत ६ वर्षातील स्थिती)
- सहा वर्षात ८१ हजार ७१६ रुग्णांना अत्यावश्यक सेवा
- अपघाती रुग्ण ५ हजार २५४
- जळीत रुग्ण ३५४
- हृदयविकार रुग्ण ९४
- विष प्राशन केलेल्या ३६५३ रुग्णांना वेळेत उपचार
- आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ९९ रुग्णांना वेळत रुग्णालयात पोहोचविले.
रुग्ण रेफरसाठी रुग्णवाहिकेचा जातो वेळ
अनेक ठिकाणी रस्त्यांची गंभीर समस्या असल्याने १०८ रुग्णावाहिकांमध्ये मेंटन्सची समस्या येते. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरी रुग्णवाहिका तत्पर असणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश ठिकाणी या रुग्णवाहिकेचा उपयोग शहरांतर्गत रुग्णांना रेफर करण्यासाठीच होतो. परिणामी अनेकदा रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहचू शकत नाही.
गत सहा वर्षात राज्यातील १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेने ४६ लाखांवर रुग्णांना सेवा देत त्यांचे प्राण वाचविले आहेत. ही सेवा प्रामुख्याने महामार्गावरील अपघातांसह इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे. अशाच अत्यावश्यक कारणांसाठी या रुग्णवाहिकांचा उपयोग झाल्यास गोल्डन अवर साधून अनेकांचे प्राण वाचविणे शक्य होईल.
- डॉ. दीपक कुमार उके, आॅपरेशन हेड, पूर्व महाराष्ट्र, राज्य आप्तकालीन वैद्यकीय सेवा