कोरोना रुग्णांसाठी ‘१०८’ ठरली देवदूत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 11:45 PM2020-11-29T23:45:00+5:302020-11-29T23:45:02+5:30
Akola News नागरिकांना वेळेत पोहोचू शकल्याने अनेकांना नवजीवन देण्याचे काम त्यामुळे साध्य झाले आहे.
- संतोषकुमार गवई
पातूर: भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि भारत विकास समूहाच्या संयुक्त संघटनेतर्फे चालविल्या जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिका कोरोनाच्या संकट काळात रुग्णांसाठी जीवनवाहिनी म्हणून धावून आल्या आहेत. कोरोना विषाणूने जिल्ह्यात पाय पसरला तेव्हापासून १०८ रुग्णवाहिका रुग्णांची सेवा करीत आहे. कोरोनाच्या संकटात ‘१०८’ या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा तब्बल १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. अगदी मोफत पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवेमुळे वैद्यकीय मदत नागरिकांना वेळेत पोहोचू शकल्याने अनेकांना नवजीवन देण्याचे काम त्यामुळे साध्य झाले आहे.
सन २०१४ पासून जिल्ह्यात तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी एकूण १६ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यापैकी १० रुग्णवाहिका योग्य नियोजन करून कोरोना साथीसाठी विशेष तैनात करण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिका गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना रुग्णांना घरून ते रुग्णालय व रुग्णालय ते घरी त्यानंतर क्वारंटीन सेंटरपर्यंत सेवा पुरवित आहेत. आतापर्यंत तब्बत १० हजार कोरोनासंदिग्ध व कोरोनाबाधित रुग्णांनी १०८ रुग्णवाहिकेचा लाभ घेतल्याचे जिल्हा प्रशासक डॉ. फैजान जागीरदार यांनी सांगितले. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये इतर गरोदर महिलांची, रुग्णांची गैरसोय न व्हावी यासाठीसुद्धा रुग्णवाहिका राखून ठेवून रुग्णांना सेवा दिली. कोरोनाच्या संकट काळात १० रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक मार्च ते ऑक्टोबर महिन्यांपर्यंत २४ तास कृषी विद्यापीठ येथील क्वारंटीन सेंटरवरच सेवा दिली आहे. अशा परिस्थितीतही महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यातील सर्वात कमी म्हणजे फक्त ४ कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाली होती. त्यांनीही कोरोनावर मात करीत पुन्हा सेवा दिली. १०८ रुग्णवाहिकामध्ये कार्यरत आपत्कालीन पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. जुबेर नदीमसोबत डॉ. शाहनवाज चौधरी, डॉ. नागेश जयस्वाल, डॉ. जावेद खान, डॉ. अफरोज, डॉ. इम्रान देशमुख, डॉ. गुफरान तसेच पायलट सचिन बारोकार, नितीन साठे, अक्षय देशमुख, अमोल टिकार, धीरज बंड, संतोष ब्राह्मणकर, छोटू फोकमारे, सचिन आगाशे, दिनेश गोमाशे, विठ्ठल नालकांडे, महेश ढोरे आणि १०८ रुग्णवाहिकांचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी योगदान दिले आहे.
कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य नियोजन करून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना पथकाने सेवा दिली. तसेच जिल्ह्याबाहेरील अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यातही रुग्णवाहिका पाठवून सेवा दिली. कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत सेवा सुरूच राहील.
- सचिन बारोकार, अध्यक्ष, १०८ रुग्णवाहिका कर्मचारी संघ, अकोला.
कोरोनाच्या कठीण परिस्थितीत १०८ पथकाने प्रशंसनीय कार्य केले असून, मी सर्व डॉक्टर व वाहनचालकांचा आभारी आहे. सेवा ही सुरूच राहील.
- डॉ. फैजान जागीरदार, जिल्हा प्रशासक, १०८ रुग्णवाहिका, अकोला.