दहावी पुनर्रचित अभ्यासक्रम, मूल्यमापनाच्या तासिकांचे नियोजन तयार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:42 PM2018-09-11T13:42:25+5:302018-09-11T13:44:27+5:30
शालेय स्तरावर अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन करण्यात आले आहे.
अकोला : २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आल्यावर पुनर्रचित अभ्यासक्रम, विषययोजना, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन करण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार शालेय स्तरावर अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी नव्याने पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात आल्यावर, दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रम, मूल्यमापनाच्या तासिकांचे नियोजनामध्ये विद्यार्थ्यास तीन भाषा विषय असणे अनिवार्य केले आहेत. त्याप्रमाणे प्रथम भाषा, द्वितीय भाषा व तृतीय भाषेचा समावेश आहे. १०० गुणांच्या भाषा विषयामध्ये १०० गुण लेखी परीक्षा, तर ५० गुणांच्या भाषा विषयासाठी ५० गुण लेखी परीक्षा, तर दोन्ही सत्र परीक्षेत स्वतंत्रपणे ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन अशी विभागणी करण्यात आली. दहावीचे अंतिम मूल्यमापन १००/५० गुणांच्या लेखी परीक्षेनुसार होणार आहे. दहावीसाठी मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी (तृतीय) ऐवजी इंग्रजी (प्रथम) भाषा अभ्यासण्याची पर्यायी सोय उपलब्ध केली आहे. प्रथम भाषा इंग्रजी की मराठी, हे निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना दिले आहे. या भाषांसह इतर भाषांसाठी कृतिपत्रिका तयार करून मूल्यमापन करावे. गणित भाग १ व २ (बीजगणित व भूमिती) हा विषय १०० गुणांचा असून, या १०० गुणांमध्ये ८० गुण लेखी परीक्षा व २० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी दिले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची दोन स्वतंत्र पाठ्यपुस्तके असून, लेखी परीक्षेसाठी पेपर १ व २ साठी प्रत्येकी ४० गुणाच्या स्वतंत्र्य प्रश्नपत्रिका असतील. उर्वरित २० गुण प्रात्यक्षिकाचे राहतील. सामाजिक शास्त्रे विषयामध्ये इतिहास, राज्यशास्त्र मिळून एक आणि भूगोल विषय मिळून एक अशी दोन पुस्तके आहेत. इतिहासाला ४०, राज्यशास्त्र २० गुण व भूगोल ४०, असे एकूण १०० गुणांची परीक्षा राहील. तसेच एनएसक्युएफचे व्यवसाय विषयाला ३० गुण लेखी परीक्षा आणि ७० गुण प्रात्यक्षिक परीक्षेप्रमाणे आहेत. या सर्व विषयांनुसार शालेय स्तरावर अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
दहावीचा पुनर्रचित अभ्यासक्रम हा कृतींवर आधारित आहे. शाळांना दिलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी दहावीचा अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन केले आहे.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी
माध्यमिक, जि.प. अकोला