११९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अंतिम टप्प्यात!
By admin | Published: September 13, 2016 03:02 AM2016-09-13T03:02:22+5:302016-09-13T03:02:22+5:30
समायोजनाविषयी शिक्षकांमध्ये उत्सुकता; १४ सप्टेंबरपासून समायोजन.
अकोला, दि. १२: शिक्षणसंस्थांकडून रिक्त पदे व अतिरिक्त शिक्षकांची ऑनलाइन माहिती मागविण्याचे काम पूर्ण झाले असून, सद्यस्थितीत जिल्हय़ात ११९ माध्यमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अंतिम टप्प्यात असून, १४ सप्टेंबरपासून अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया करण्यात येईल. जिल्हय़ातील कोणत्या शाळेत आपले समायोजन करण्यात येते, याविषयी शिक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असून, शिक्षक मिळणार्या शाळेची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गत महिनाभरापासून माध्यमिक शाळा, शिक्षणसंस्थांकडून रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षकांची ऑनलाइन माहिती मागविण्याचे काम सुरू होते; परंतु माहिती देताना, शिक्षणसंस्था, शाळांनी प्रचंड घोळ करून ठेवला. अनुसूची ह्यफह्ण नुसार सेवाज्येष्ठता यादीतील ज्येष्ठ शिक्षकांना अतिरिक्त ठरवून कनिष्ठ शिक्षकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. नातेसंबंध, आर्थिक व्यवहारांमुळे जिल्हय़ातील जवळपास सर्वच शिक्षणसंस्थांनी कनिष्ठ शिक्षकांच्या नावे वगळून ज्येष्ठ शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याचा पराक्रम केल्याचे स्पष्ट झाले आहे. संचमान्यता, बिंदूनामावली, अनुसूची ह्यफह्ण नुसार यादी लपवून ठेवून शिक्षणसंस्थांनी चुकीची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाला पुरविली होती; परंतु आता ११९ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची यादी तयार करण्याचे काम माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात सुरू आहेत; परंतु तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांच्या समायोजनाचे वेळापत्रक अपलोड होत असल्याने, शिक्षणाधिकारी कार्यालयाने पुणे येथे माहिती पाठवून त्यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.