सकाळी ११ची पंढरपूर विशेष रेल्वे अकोल्याहून निघाली दुपारी ३ वाजता; अकोला स्थानकावर भाविक ताटकळत
By Atul.jaiswal | Published: June 27, 2023 04:52 PM2023-06-27T16:52:18+5:302023-06-27T16:53:16+5:30
पूर्णाहून रेक पोहचली उशिरा
अकोला : ऐन वेळेवर वाशिम-हिंगोली-पूर्णा मार्गे जाहिर करण्यात आलेली अकोला ते पंढरपूर आषाढी एकादशी विशेष रेल्वे मंगळवार, २७ जून रोजी सकाळी ११ वाजता अकोल्याहून मार्गस्थ होणार होती. परंतु, पूर्णा येथून गाडीची रेक उशिरा आल्याने ही विशेष गाडी अकोला येथून दुपारी १४:५५ वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. तोपर्यंत या गाडीने प्रवास करण्यासाठी वेळेवर पोहोचलेल्या भाविकांना मात्र चार तास ताटकळत राहावे लागले.
विदर्भातून पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची लक्षणिय संख्या पाहता मध्य रेल्वेने अकोला-भूसावळ मार्गे नागपूर व अमरावती येथून तीन विशेष गाड्या जाहिर केल्या. वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील भाविकांसाठी दक्षीण-मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे चालविण्याची भाविकांना अपेक्षा होती. परंतु, सोमवार, २६ जूनच्या दुपारपर्यंत एकही रेल्वे जाहीर झाली नव्हती. अखेर सायंकाळी वाशिम-हिंगोली मार्गे अकोला ते पंढरपूर विशेष रेल्वेच्या अप व डाऊन अशा फेऱ्या जाहिर करण्यात आल्याने भाविकांना दिलासा मिळाला.
नियोजनानुसार ०७५०५ अकोला-पंढरपूर ही विशेष रेल्वे मंगळवारी सकाळी ११ वाजता अकोला स्थानकावरून मार्गस्थ होणार होती. परंतु, पूर्णा येथून या गाडीची रेक अकोला स्थानकावर दुपारी १४: १४ वाजता आली. लोको रिव्हर्सल व इतर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर १४:५५ वाजता पंढरपुरच्या दिशेने रवाना झाली. याप्रसंगी लोको पायलट विजयकुमार सिंग, साहायक लोको पायलट डेमराज जी., गार्ड अजयकुमार यांचे स्वागत करण्यात येऊन हिरवी झेंडी देण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक गोपी ठाकरे, डीआरयूसीसी सदस्य ॲड. एस. एस. ठाकूर, डॉ. अशोक ओळंबे, दक्षीण मध्य रेल्वेचे अकोला स्थानक प्रबंधक शंकर शिंदे, वाहतूक निरीक्षक महेंद्र उजवे आदी उपस्थित होते.