CoronaVirus : एकाच ‘व्हीआरडीएल’ लॅबवर ११ जिल्ह्यांचा ताण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:08 AM2020-04-03T11:08:37+5:302020-04-03T11:08:45+5:30
संधीग्ध रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी नागपूर येथील ‘व्हीआरडीएल’ लॅबमध्ये केली जात आहे.
अकोला : अकोल्यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील कोरोनाच्या संधीग्ध रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी नागपूर येथील ‘व्हीआरडीएल’ लॅबमध्ये केली जात आहे. गत काही दिवसांपासून कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने या लॅबवर ११ जिल्ह्यांचा ताण येत आहे. त्यामुळे रुग्णांचे वैद्यकीय अहवाल मिळण्यास विलंब होत आहे.
सर्वोपचार रुग्णालयातील ‘आयसोलेशन’ कक्षात कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. येथे दाखल रुग्णांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी दररोज सकाळी ५ वाजता नागपूरसाठी पाठविण्यात येतात. वैद्यकीय तपासणीचा अहवाल येईपर्यंत येथे दाखल प्रत्येक रुग्णावर उपचार सुरू राहतो. शिवाय, नवीन रुग्णही दररोज दाखल होत आहेत. अहवाल मिळेपर्यंत रुग्णाला सुटी देणे शक्य नसल्याने ‘आयसोलेशन’ कक्षात कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. एकाच लॅबवर मर्यादित मनुष्यबळावर सुरू असलेल्या निरंतर कामामुळे ताण वाढत आहे. कामाच्या वाढत्या ताणामुळे वैद्यकीय अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
अकोल्यातील ‘लॅब‘ सुरू झाल्यास मिळणार दिलासा!
राज्यात सध्या एकमेव ‘व्हीआरडीएल’ लॅब असून, त्यावर कामाचा ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत अकोल्यातील लॅब सुरू झाल्यास या ‘लॅब’वरील मोठा ताण कमी होणार आहे. अकोल्यातील लॅब ही विदर्भातील दुसरी ठरणार असून, त्याचा लाभ अकोल्यासह बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांनाही होणार आहे.