महामार्गावर वाहनाचा वेग वाढविल्याची किंमत ११ लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:24 AM2021-09-08T04:24:07+5:302021-09-08T04:24:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : कोरोना संकटकाळात बरेच महिने लाॅकडाऊन कायम राहिले. यामुळे शहरांतर्गत रस्त्यांसह महामार्गांवरही वाहनांची वर्दळ कमी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : कोरोना संकटकाळात बरेच महिने लाॅकडाऊन कायम राहिले. यामुळे शहरांतर्गत रस्त्यांसह महामार्गांवरही वाहनांची वर्दळ कमी झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली असून, अनेक वाहनचालकांकडून निर्धारित वेगमर्यादेचे उल्लंघन केले जात आहे. महामार्ग पोलिसांनी अशा दाेन हजार ९०९ वाहनचालकांकडून जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत ११ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केला.
जिल्ह्यातील वाहतूक पाेलिसांच्या ताफ्यात २०१९मध्ये समाविष्ट झालेल्या ‘स्पीडगन व्हॅन’मुळे धावत्या गाडीचा वेग मोजण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. २०२० या वर्षात या माध्यमातून तब्बल ९७ लाख ९८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. चालू वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत महामार्ग पोलिसांकडून एकूण दाेन हजार ९०९ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या माध्यमातून ११ लाख ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यात सर्वाधिक केसेस मार्च २०२१मधील असून, एप्रिलमध्येही कारवायांचे प्रमाण तुलनेने कमी राहिले. रस्त्यावरून धावणारे वाहन ३०० मीटरपर्यंत पुढे गेले तरी स्पीडगनने ते कॅच करता येत असल्याने वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन करण्याची हिंमत करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
धावत्या गाडीचा मोजला जातो वेग
वाहतूक पाेलिसांना शासनाने ‘ओव्हर स्पीड’ धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी ‘इंटरसेप्टर’ प्रणाली असलेले चारचाकी वाहन दिले. चारचाकी वाहनांसाठी ७४ किलोमीटर प्रतितास तर दुचाकी, ट्रक आणि एस. टी. बसला ६३ किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा ठरवून दिलेली आहे. स्पीडगनने हा वेग मोजला जातो.
एसएमएसवर मिळते पावती
महामार्गावरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून दंड वसूल करणे अशक्य आहे. त्यामुळे स्पीडगनने कारवाई केल्यानंतर दंडाच्या रकमेची पावती एसएमएसव्दारे पाठविण्यात येते. त्यास वाहनचालकांकडून अपेक्षित प्रतिसादही मिळत असल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून मिळाली.
महामार्गावर कोणत्या महिन्यात किती दंड
महिनादंड
जानेवारी १ लाख ४० हजार
फेब्रुवारी १ लाख १० हजार
मार्च १ लाख ७० हजार
एप्रिल १ लाख ५० हजार
मे १ लाख ४० हजार
जून १ लाख ३० हजार
जुलै १ लाख ४० हजार
ऑगस्ट १ लाख २० हजार