समायोजनानंतरही ११ शिक्षक अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 03:21 PM2019-09-09T15:21:44+5:302019-09-09T15:21:48+5:30
३९ अतिरिक्त शिक्षकांपैकी ११ शिक्षक पदस्थापनेशिवाय अधांतरी आहेत.
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या समायोजन प्रक्रियेत रिक्त असलेल्या ६७ पैकी २८ पदांवर शिक्षकांना समायोजनातून पदस्थापना देण्यात आली. ३९ अतिरिक्त शिक्षकांपैकी ११ शिक्षक पदस्थापनेशिवाय अधांतरी आहेत. त्यामुळे त्यांच्या पदस्थापनेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आस्थापनाविषयक प्रश्नांबाबत तक्रार निवारण अभियान १० सप्टेंबरदरम्यान राबविले जात आहे. तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येत आहे. समितीचे सदस्य सचिव म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग तर सदस्य म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी आहेत. त्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचेही ठरले. त्यानुसार ३९ शिक्षक अतिरिक्त असल्याचे पुढे आले. इयत्ता पाचवीचे ६, इयत्ता ६ ते ८ वीचे २६, इयत्ता ९ ते १० वीचे ७ शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यापैकी इयत्ता पाचवीच्या एक आणि इयत्ता ६ ते ८ वीच्या १० शिक्षकांना पदस्थापना मिळाली नाही. प्रत्यक्षात ६७ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्या सर्व पदांवर पदस्थापना देता येते; मात्र जिल्हा परिषदेत ११ शिक्षक पदस्थापनेपासून वंचित आहेत. त्यांच्या पदस्थापनेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येणार आहे.