‘आरबीएसके’अंतर्गत ११५ बालकांची हृदय तपासणी; मुंबईत होणार नि:शुल्क शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 03:12 PM2019-08-12T15:12:40+5:302019-08-12T15:12:44+5:30
सर्वोपचार रुग्णालयात ११५ बालकांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली आहे.
अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये होणारी आरोग्य तपासणी गोरगरीब बालकांसाठी संजीवनी ठरत आहे. यांतर्गत शनिवार, १० आॅगस्ट रोजी सर्वोपचार रुग्णालयात ११५ बालकांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली आहे.
हृदयविकाराशी लढा देत ‘आरबीएसके’अंतर्गत दरवर्षी शेकडो बालकांची तपासणी करून, चिमुकल्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया केली जात आहे. या मोहिमेंतर्गत शनिवारी मुंबई येथील डॉ. तनुजा कारंडे, डॉ. मुग्धा करपे, अनुराधा सावंत व श्रीरंग करंदीकर यांच्या पथकाने या बालकांची तपासणी केली आहे. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी टू डी ईको तंत्रज्ञानाद्वारे बाल रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, वैद्यकीय अहवालानंतरच या विद्यार्थ्यांमधून शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या बालकांना शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे पाठविण्यात येणार असून, त्यांचा संपूर्ण खर्च प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शैक्षणिक सत्रात दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आढळणाऱ्या विविध आजारांचे निदान केले जात असले, तरी हृदयविकार आणि डोळ्यांच्या तिरळेपणाच्या उपचारावर जास्त भर दिला जातो. गत वर्षभरात १३० पेक्षा जास्त हृदयविकाराच्या संशयित बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये १०० पेक्षा जास्त बालकांना हृदयविकार असल्याचे निष्पन्न झाले. या बालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यावर उपचार करणे त्यांच्या कुटुंबीयांना शक्य नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या कुटुंबीयांसाठी संजीवनी ठरत आहे. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक नंदू कांबळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शेकडो कुटुंबीयांना मिळाला दिलासा!
यापूर्वी बालकांमध्ये हृदयविकार असल्याचे उशिरा निष्पन्न होत असल्याने त्यांना प्राण गमवावे लागत होते; परंतु राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांच्या या मोहिमेमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अशा रुग्णांचे निदान होण्यास मदत होत आहे. बालकांमध्ये आढणाºया अशा रुग्णांना शोधून त्यांच्यावर योग्य उपचार झाल्याने शेकडो कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
‘आरबीएसके’अंतर्गत दरवर्षी बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात हृदयविकार असल्याचे निदर्शनास येत आहे. या बालकांमध्ये आजाराचे निदान करून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. हा लढा असाच कायम राहणार आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.