‘जलयुक्त’ची ११९५० कामे; पण पाणीटंचाई कायमच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:18 PM2019-07-29T12:18:39+5:302019-07-29T12:18:45+5:30
जिल्ह्यात ६४ हजार २८२ टीएमसी जलसाठा निर्माण करणारी ‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करण्यात आली असली तरी, जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या कायमच आहे.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात सन १०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांच्या कालावधीत ६१३ गावांमध्ये ११ हजार ९५० कामे पूर्ण करण्यात आली असून, ८४१ कामे अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यात ६४ हजार २८२ टीएमसी जलसाठा निर्माण करणारी ‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करण्यात आली असली तरी, जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. राज्यात वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सन २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षात जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या सातही तालुक्यातील ६१३ गावांमध्ये अंतिम व सुधारित आराखड्यानुसार १२ हजार ७९१ ‘जलयुक्त शिवार’ची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. प्रस्तावित कामांपैकी गत जून अखेर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ११ हजार ९५० कामे पूर्ण करण्यात आली असून, ८४१ कामे अद्याप प्रलंबित आहेत. चार वर्षांच्या कालावधीत जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या कामांच्या माध्यमातून ६४ हजार २८२ टीसीएम जलसाठा निर्माण करणारी कामे पूर्ण करण्यात आली असली तरी; जिल्ह्यातील विविध भागात अद्यापही पाणीटंचाईची परिस्थिती कायम आहे. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आहे; मात्र जिल्ह्यातील २४ गावांमध्ये २८ टँकरद्वारे जिल्हा प्रशासनामार्फत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या कामांच्या ठिकाणी जलसाठा केव्हा उपलब्ध होणार आणि टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना जलसाठ्याचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अडगावात आदर्श!
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. येथे गाव तलाव, शेततळे, विदु्रपा नदीचे खोलीकरण, समतल चर, विहिरींचे पुनर्भरण इत्यादी कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. जलसंधारणाच्या कामांमुळे गाव शिवारातील पाणी पातळीत वाढ होत असून, जलयुक्त शिवारच्या कामांमुळे निर्माण होत असलेल्या जलसाठ्याचा उपयोग पिकांसाठी होत आहे. त्यामुळे या गावात करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांचा शेतकºयांना फायदा होत आहे.
‘जलयुक्त शिवार’ कामे
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात जून अखेरपर्यंत ११ हजार ९५० जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्यामध्ये पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जुने सिमेंट नालाबांध, कोल्हापुरी बंधाºयांची दुरुस्ती व नूतनीकरण, जुन्या जलस्रोतातील गाळ काढणे,जलस्रोतांचे बळकटीकरण, नदी-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, विहिरींचे पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर इत्यादी कामांचा समावेश आहे.
गत चार वर्षात जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार ’ ची कामे करण्यात आली; मात्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाळ्यातही पाणीटंचाईची समस्या कायम आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार कामांच्या माध्यमातून पाणीटंचाईच्या प्रश्नाचे निवारण अद्याप झाले नाही आणि ‘जलयुक्त’च्या कामांमधून शेती ओलीतासाठी शेतकºयांनाही लाभ झाला नाही. त्यानुषंगाने ‘जलयुक्त’च्या कामांद्वारे जलसंधारणाचा उद्देश सार्थक झाला नाही.
-मनोज तायडे
शेतकरी जागर मंच
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या वर्षात अकोला तालुक्यातील दुधलम येथे बंधारे, नाल्यांचे खोलीकरण व तलावांतील गाळ काढण्याची मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली. या जलसंधारणाच्या कामांद्वारे पाऊस पडल्यानंतर चांगला पाणीसाठा निर्माण होत आहे. गाव शिवारातील पाणी पातळीत वाढ होत असून, पावसात खंड पडल्यास साचलेल्या पाण्याचा पिकांसाठी वापर होतो. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांचा शेतकºयांना फायदा होत आहे.
-शंकरराव महल्ले,
दुधलम, ता. अकोला.