मुख्याध्यापक गैरहजर राहिल्यास अकरावीत प्रवेश प्रक्रिया रद्द!
By admin | Published: April 18, 2017 01:48 AM2017-04-18T01:48:19+5:302017-04-18T01:48:19+5:30
शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा : आॅनलाइन अकरावी प्रवेशाबाबत बुधवारी सभा
अकोला : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेश केंद्रीय पद्धतीने आॅनलाइन करण्यात येणार आहेत. या विषयावर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापकांची बुधवारी सभा आयोजित केली आहे. या सभेला प्राचार्य, मुख्याध्यापक गैरहजर राहिल्यास त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाला इयत्ता अकरावीचे प्रवेशित विद्यार्थी दिल्या जाणार नाहीत, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिला आहे.
इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने आॅनलाइन करण्यासाठी यापूर्वी सभा घेण्यात आली होती. या सभेमध्ये आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी संमतिपत्र व कनिष्ठ महाविद्यालयांची संपूर्ण माहिती विहित प्रपत्रामध्ये मागितली होती; परंतु शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी अद्यापपर्यंत विहित प्रपत्रामध्ये माहिती सादर केली नाही. या शैक्षणिक सत्रामध्ये मनपा क्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याचे निश्चित केल्यामुळे १९ एप्रिल रोजी रालतो विज्ञान महाविद्यालय येथे सकाळी ९ वाजता सभा घेण्यात येणार आहे. इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्यासाठी शहरातील अनुदानित, विनाअनुदानित, कायमविना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. सभेमध्ये आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे. सभेला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक गैरहजर राहिल्यास त्यांच्या महाविद्यालयात अकरावी प्रवेशित विद्यार्थी दिले जाणार नाहीत, असा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिला आहे.