कृषी विद्यापीठातील पिके धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:27 AM2017-08-22T00:27:19+5:302017-08-22T00:27:19+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी मागील १२ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारल्याने कृषी विद्यापीठाचे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘समान काम, समान वेतन’ लागू करू न, थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी मागील १२ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारल्याने कृषी विद्यापीठाचे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील मुगाचे पीक वाळले आहे; परंतु काढण्यासाठी मजूरच नसल्याने पावसाने हे पीक सडण्याच्या मार्गावर आहे. या संपावर तोडगा न निघाल्याने कृषी विद्यापीठाची इतरही संशोधनाची कामे प्रभावित झाली आहेत.
केंद्र सरकारने पारित केलेल्या कायदा १९७६ कलम ४ अन्वये तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे सर्व कृषी विद्यापीठात हे वेतन दिले जात आहे. तथापि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी मजुरांना समान वेतन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत मजुरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. विद्यापीठाच्या बाराही विभागातील रोजंदारी मजुरांनी कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर हे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार संघटनेच्या नेत्यांनी केल्याने शास्त्रज्ञांना रात्री कृषी विद्यापीठाच्या इमारती तसेच संशोधन व पिकांंची काळजी घ्यावी लागत असून, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थ्यांनाही शेतीची कामे करण्याची वेळ आली आहे.
मजुरांच्या विद्यापीठ स्तरावरील मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ‘समान काम, समान वेतन’ हे कृषी विद्यपीठाच्या अख्त्यारित येत नाही. त्यासाठी कार्यकारी परिषदेत ठराव घेऊन शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, नेत्यांनासोबत घेतले जाईल. त्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांनी कामावर येण्याची गरज आहे.
- डॉ. दिलीप एम. मानकर,
संचालक संशोधन, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला.