नांदेडहून निघालेल्या १२ कोरकू मजुरांचा रेल्वे रुळावरून चिखलदऱ्यासाठी पायी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 10:23 AM2020-04-26T10:23:54+5:302020-04-26T10:26:15+5:30
नांदेड येथे विविध कामांसाठी गेलेल्या १२ मजुरांनी पूर्णा ते अकोला ब्रॉडगे्रज रेल्वे मार्गाने प्रवास सुरू केला.
सायखेड : अमरावती जिल्ह्यातील अनेक आदिवासी मजूर राज्यातील इतर भागात ‘लॉकडाउन’मुळे अडकले आहेत. मजुरी नसल्याने त्यांच्यावर उपासमारी आली. त्यामुळे या मजुरांनी पायीच आपल्या गावाकडे कूच केली आहे. नांदेड येथे विविध कामांसाठी गेलेल्या १२ मजुरांनी पूर्णा ते अकोला ब्रॉडगे्रज रेल्वे मार्गाने प्रवास सुरू केला. २४ एप्रिल रोजी हे मजूर सायखेड येथे पोहोचले.
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील १२ कोरकू मजूर नांदेड येथे विविध कामासाठी गेले होते. लॉकडाउनमुळे या मजुरांना काम नाही. त्यामुळे उपासमारी होत असल्याने या मजुरांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला; मात्र संचारबंदीमुळे वाहनाची व्यवस्था नसल्याने त्यांनी पायीच गाव गाठण्याचा निर्णय घेतला. या मजुरांनी नांदेड येथून पूर्णा ते अकोला ब्रॉडगेज रेल्वे मार्गाने पायी प्रवास सुरू केला. हे सर्व मजूर २४ एप्रिल रोजी सायखेड शेतशिवारात पोहोचले व रात्री त्यांनी तेथे मुक्काम केला. यामध्ये दोन चिमुकले, युवक, महिला व कुटुंब प्रमुख अशा १२ मजुरांचा जथा गावात पोहोचल्याची माहिती मिळताच चोहेगावच्या ग्रामपंचायत सदस्य कमलबाई ग्यानुजी बोरकर यांनी त्यांना नाश्ता दिला. तापत्या उन्हात हे मजूर चिमुकल्यांना घेऊन नांदेडवरून पायी येत असताना अनेक ठिकाणी त्यांना जेवण्यासाठी दानशूरांनी तांदूळ व इतर साहित्य दिल्याचे त्यांनी सांगितले. केवळ मजुरी करून उरदनिर्वाह करणाºया या कुटुंबाने उपासमारी होऊ नये म्हणून गावाकडे पायी जाण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)