१२ लाखांचे धनादेश जनता बँकेतून गायब!
By admin | Published: April 17, 2017 01:54 AM2017-04-17T01:54:45+5:302017-04-17T01:54:45+5:30
सिटी कोतवालीत तक्रार, वटविण्यासाठीचे धनादेश गायब केल्याने खळबळ
अकोला - अकोला जनता कमर्शियल को-आॅपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या रयत हवेलीजवळ असलेल्या मुख्य शाखेतून तब्बल १२ लाख रुपयांचे चार धनादेश गहाळ करण्यात आले आहेत. या प्रकरणाची तक्रार खातेदाराने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.
रतनलाल प्लॉट येथील रहिवासी अनुप निरंजनकुमार डोडिया यांचा दलालीचा व्यवसाय आहे. या दलालीच्या व्यवसायाचे त्यांचे अकोला जनता बँकेत रिषभ मार्केटींग आणि दुसरे जी. एम. ट्रेडिंग या दोन नावाने चालू खाते गत १० वर्षांपासून असून, या दोन्ही खात्याचे प्रोप्रायटर अनुप डोडिया आहेत. डोडिया यांनी गौरव अशोक शर्मा व त्यांच्या जय गजानन ट्रेडिंग कंपनीला पैसे पुरविले होते. अनुप डोडिया यांना गौरव अशोक शर्मा व त्यांच्या जय गजानन ट्रेडिंग कंपनीने चार धनादेश दिले होते. यामध्ये पहिला धनादेश क्रमांक ००००८३ हा १० एप्रिल रोजी अनुप डोडिया यांनी त्यांच्या जनता बँकेतील बचत खाते क्रमांक ३०७५५ मध्ये वटविण्यासाठी लावला होता. त्यानंतर याच तारखेत अनुप डोडिया प्रोप्रायटर असलेल्या जी. एम. ट्रेडिंगच्या नावे असलेल्या ६७०० क्रमांकाच्या चालू खात्यात १ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश क्रमांक ००८९८९ वटविण्यासाठी दिला. हा धनादेश अॅक्सीस बँकेचा होता. त्यानंतर रिषभ मार्केटिंगच्या चालू खात्यात १ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश क्रमांक ००८९९० आणि दोन लाख रुपयांचा धनादेश क्रमांक ०७३३७९ वटविण्यासाठी लावण्यात आले होते. याची पावतीही बँकेच्या स्वाक्षरी आणि शिक्क्यासह देण्यात आली. मात्र, धनादेश वटला नाही.
खात्यात जमा न झाल्याने ते बँकेत विचारण्यासाठी गेले असता, जनता बँकेच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर डोडिया यांनी ‘रिटर्न मेमो’ मागितले, ते बँकेने दिले नाहीत. धनादेश परत मागितले असता बँकेच्या अधिकाऱ्यांनी धनादेश गहाळ झाल्याचे सांगितले. त्यामुळे डोडिया यांनी प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.
जनता बँकेतील मुख्य शाखेतील एका शिपायाच्या चुकीमुळे सदर चार धनादेश दुसऱ्याच व्यक्तीला देण्यात आले आहेत. सदर धनादेश शोधण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, शिपायाच्या चुकीने हे चारही धनादेश दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आले असल्याने या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे. हा प्रकार चुकीने घडला आहे. सदर व्यक्ती धनादेश बँकेत आणूण देणार आहे.
-अनिल लटुरिया,शाखा व्यवस्थापक, जनता बँक मुख्य शाखा.