दानापूर येथे आरोग्य केंद्रात १२ पदे रिक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:21 AM2021-08-29T04:21:01+5:302021-08-29T04:21:01+5:30
दानापूर : तेल्हारा तालुक्यातील दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव, आरोग्य सहाय्यक ,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, ...
दानापूर : तेल्हारा तालुक्यातील दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव, आरोग्य सहाय्यक ,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, मुख्यालय आरोग्य सेविका, परिचर, अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. येथिल आरोग्य केंद्रात बारा पदे रिक्त असून, रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. परिणामी रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय होत आहे.
दानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील ४० ते ४२ हजारांच्यावर ग्रामस्थांचा समावेश आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ३४ गावांतील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असून, एकूण सात उपकेंद्र आहेत. त्यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र औषध गोळ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिपूर्ण असणे गरजेचे आहे; मात्र सद्यस्थितीत या केंद्रांचा भार केवळ १२ ते १३ कर्मचाऱ्यांच्या भरोशावर असल्याने आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र आहे. येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासह इतर कार्यक्रम राबवणे कठीण झाले आहेत. कोविड लसीकरण सुरु असल्याने डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. साथ रोगाचे दिवस असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावात कीटकजन्य व जलजन्य आजाराची साथ पसरण्याची शक्यता आहे. तरी वरिष्ठांनी त्वरित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.
--------------
ही पदे रिक्त
आरोग्य केंद्रात नियमित आरोग्य सेविका एकूण मंजूर पदे ८ असून, त्यापैकी ४ रिक्त, आरोग्य सेवक एकूण ८ पैकी ६ रिक्त, आरोग्य साहाय्यक एकूण २ पदांपैकी १ रिक्त, सीएचओ एकूण ७ पैकी ४ पदे रिक्त, औषध निर्माण अधिकारी पद बऱ्याच वर्षांपासून रिक्त, मुख्यालय आरोग्य सेविका पद रिक्त, परिचर एकूण चारपैकी दोन पदे रिक्त आहेत.
-----------------------
रिक्त पदे असल्यामुळे प्रा. आ. केंद्राचा कारभार चालविताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत आम्ही वरिष्ठांकडे रिक्त पदे भरण्याची मागणी केलेली आहे.
डॉ. योगेश प्रभे, वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र दानापूर.
------------------
कर्मचारी कमी असल्याने रुग्णांना बऱ्याच वेळा ताटकाळत बसावे लागते. औषधी वाटायला कोणीच नाही. तरी संबंधित अधिकारी यांनी लक्ष द्यावे.
- सपना धम्मापाल वाकोडे, सरपंच, दानापूर.